यवतमाळमध्ये बिबट्याचे कातडे, काळविटाचे शिंग जप्त; वन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:40 PM2020-05-02T15:40:53+5:302020-05-02T15:41:51+5:30
डीएफओंच्या नेतृत्वात धाड, एकाला अटक
सोनखास (यवतमाळ): यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी १०.३० वाजता वन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० जणांच्या पथकाने उत्तरवाढोणा येथे धाड घातली. या धाडीत तीन वर्ष वयाच्या बिबटाचे कातडे आणि काळविटाचे शिंग जप्त करण्यात आले.
या प्रकरणी गजानन वामन कुनगर (४५) रा. उत्तरवाढोणा याला अटक करण्यात आली आहे. वन कोठडी मिळविण्यासाठी त्याला न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. गजाननने हे चामडे व शिंग कोठून मिळविले, त्याने स्वत: शिकार केली की अन्य कुणाकडून आणले याचा शोध नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांचे पथक येणार आहे.
उत्तरवाढोणा येथे बिबटाची शिकार करून अवयव शेतात तर चामडे घरात दडवून ठेवल्याची टीप वन विभागाला मिळाली. त्यावरून उपवनसंरक्षक पिंगळे यांच्या नेतृत्वात शनिवारी धाड घालण्यात आली. शेतात शोध घेतला असता बिबटाचे अवयव मिळून आले नाही. मात्र घरात गोठ्यातील पांढऱ्या पिशवीत बिबटाचे कातडे, काळविटाचे शिंग आढळून आले. वन विभागाने ते जप्त केले. तीन वर्ष वयाचा हा बिबट असून २० ते २५ दिवसांपूर्वी त्याची शिकार झाली असावी असा वन अधिकाºयांंचा अंदाज आहे. तर काळविटाचे शिंग शेतात सापडले असण्याची शक्यताही वनविभागाने वर्तविली. गजानन कुण्या शिकाºयांच्या टोळीत तर सहभागी नाही ना, त्याने यापूर्वी आणखी अशा काही शिकारी केल्या का याचा शोध घेण्याचे आव्हान वन पथकापुढे आहे.
पिंगळे यांच्या नेतृत्वातील धाड पथकात उपविभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, सहायक वनसंरक्षक एस. अर्जुना, नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, दारव्ह्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गुल्हाने, भरारी पथक तसेच वनपाल व वनरक्षक यांचा समावेश आहे.