५१ रेतीघाटांकडे कंत्राटदारांची पाठ
By admin | Published: January 17, 2015 11:07 PM2015-01-17T23:07:01+5:302015-01-17T23:07:01+5:30
तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी दुपारी जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा आॅनलाईन पध्दतीने लिलाव करण्यात आला. मात्र ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ३० रेतीघाटांचा लिलाव झाला.
यवतमाळ : तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी दुपारी जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा आॅनलाईन पध्दतीने लिलाव करण्यात आला. मात्र ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ३० रेतीघाटांचा लिलाव झाला. यातून चार कोटींचा महसूल मिळाला. उर्वरित ५१ घाटांच्या लिलावाकरिता जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गतवर्षी ३० सप्टेंबरला जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत संपली होती. पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी लिलाव प्रक्रिया रखडली होती. या लिलावाकरिता ८१ घाट ठेवण्यात आले होते. मात्र सर्व घाटांना बोलीच लागली नाही. ई-निविदा पध्दतीने ४० ठेकेदारांनी बोली लावली.
यामाध्यमातून ३० घाट विकण्यात आले. जिल्ह्यातील कळंब, मारेगाव आणि दिग्रस तालुक्यातील संपूर्ण रेतीघाटांचा लिलाव झाला. इतर तालुक्यातील एक-एक घाट यानुसार लिलाव झाला. यातून चार कोटी आठ लाख ७५ हजार रूपयाचा महसूल मिळाला. लिलाव न झालेल्या ५१ रेतीघाटांसाठी पुन्हा १५ दिवसांनी प्रक्रिया राबविणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने जुळवाजुुळव सुरू केली आहे.
गतवर्षी पहिल्याच फेरीत ९९ रेतीघाटांचा लिलाव झाला होता. यामधून १७ कोटी ३९ लाखांचा निधी मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मिळालेला निधी १३ कोटीने घसरला आहे. नवीन लिलावाकरिता किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच नवीन लिलाव होणार आहे.
रेतीघाटांच्या लिलावास पात्र ठरलेल्या ठेकेदारांना रेतीघाटांच्या एकूण किंमती पैैकी २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. सोमवारपर्यंत ही रक्कम शासकीय तिजोरीत जमा करणाऱ्या ठेकेदारांनाचा रेतीचा उपसा करण्याची परवानगी मिळणार आहे. रेतीघाटातून रेती काढण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत राखीव ठेवण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)