कर्ज मेळाव्याकडे बँकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:42 PM2019-06-16T21:42:40+5:302019-06-16T21:43:26+5:30
तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
अंजनखेड ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी मंडळातील शेतकऱ्यांसाठी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो शेतकरी मेळाव्याला आले होते. मात्र तेथे साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मंडळ अधिकारी जे.के. जयस्वाल, मंडळातील तीन तलाठी यावेळी उपस्थित होते. मात्र बँकेचे अधिकारी शेवटपर्यंत आलेच नाही. मंडळ अधिकारयांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.
यानंतर स्वत: तहसीलदारांनी बँकेशी संपर्क साधला. तरीही बँकेचे प्रतिनिधी आले नाही. एकप्रकारे शासनाच्या धोरणाला बँकेकडून मूठमाती दिली गेली. बँकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी भरडले जात आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जासाठी भटकंती करावी लागत आहे.
लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी
अंजनखेड येथे शेतकरी मेळावा व मार्गदर्शनासाठी उपस्थित शेतकºयांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना सहज आणि सुलभरित्या कर्ज मिळावे म्हणून असे मेळावे घेतले जातात. मात्र त्याबाबत बँंका उदासीन आहे. या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी शेतकऱ्यांना तास न् तास प्रतीक्षा करूनही स्टेट बँकेने उदासीनता दाखविली. बँकेच्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.