भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:37+5:302021-08-28T04:46:37+5:30
फोटो पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत ...
फोटो
पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत होता, परंतु परकियांच्या आक्रमणामुळे, पारतंत्र्यामुळे देश दारिद्र्य, विविध समस्येच्या खाईत लोटला गेला. आता स्वातंत्र्य मिळाल्याने पुन्हा एकदा देशातून सोन्याचा धूर निघवा, असे प्रतिपादन प्रा.विठ्ठल शिंदे यांनी केले.
येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन जाधव यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय उंचेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा.प्रदीप राऊत, पर्यवेक्षक ज्याेती तगलपल्लेवार उपस्थित होते.
‘स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृत महोत्सवी वर्ष-एक सिंहावलोकन’ या विषयावर बोलताना प्रा.विठ्ठल शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला लागलेली कीड म्हणजे अनास्था, धर्म आणि जात. यातून भारताची सुटका होऊन देदिप्यमान प्रगती होऊन पुन्हा एकदा भारत देशातून सोन्याचा धूर निघू दे, असे आशावादी मत त्यांनी मांडले.
प्राचार्य विजय उंचेकर यांनी भारताचा इतिहास छत्रपतींच्या मावळ्यांच्या रक्ताचा, त्यागाचा, सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा असल्याचे सांगून, यातून देशाच्या युवकांनी प्रेरणा घेऊन देशाला महासत्तेच्या दारात नेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अर्चना पाल यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानाला हभप महेंद्र महाराज मस्के, डाॅ.सचितानंद बिचेवार, प्रा.अजय राठोड, प्रा.नीता खराटे, प्रा.एस.एल. राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.