शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या; झेडपीपुढे नारेबाजी, प्राथमिक शिक्षक समिती धरणे आंदोलन

By अविनाश साबापुरे | Published: June 15, 2024 07:44 PM2024-06-15T19:44:05+5:302024-06-15T19:44:17+5:30

यवतमाळ : शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, अशी नारेबाजी करीत शनिवारी जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन करण्यात आले. ...

Let teachers teach, students learn; | शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या; झेडपीपुढे नारेबाजी, प्राथमिक शिक्षक समिती धरणे आंदोलन

शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या; झेडपीपुढे नारेबाजी, प्राथमिक शिक्षक समिती धरणे आंदोलन

यवतमाळ : शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, अशी नारेबाजी करीत शनिवारी जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अशैक्षणिक कामे व अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

संचमान्यता आणि शिक्षक निर्धारण संबंधाने १५ मार्च रोजी निर्गमित केलेल्या जीआरनुसार कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर व्यपगत होणार आहे. निवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेत मानधनावर नियुक्त करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. १ ते ५, ६ ते ८ साठी शिक्षक, मुख्याध्यापक पदाचे निर्धारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनात अडसर निर्माण करणारे आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांच्या खासगी मोबाइलचा सर्रास कार्यालयीन कामासाठी वापर करण्याची प्रशासनिक मानसिकता वाढली आहे. अशैक्षणिक कामाचा तगादा आणि वेळीअवेळी देण्यात येणाऱ्या सुचना, माहिती मागण्याचा हव्यास, दैनंदिन कामकाजात अडसर निर्माण करणारा ठरत आहे. शिक्षकांच्या गणवेश संहितेचा निर्णयसुद्धा शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर घाला असून, शिक्षकांच्या प्रती अविश्वास आणि समाजामध्ये शिक्षकांप्रती नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा आहे.

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले. प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक रेकलवार, ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, किशोर सरोदे, प्रफुल फुंडकर, संदीप मोहाडे, जि.प. कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, शेख शेरु, मुकेश भोयर, जुनी पेन्शन आघाडीचे नदीम पटेल, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष राजहंस मेंढे, रवींद्र उमाटे, विशाल साबापुरे, विलास गुल्हाने, सुभाष लेाहकरे, आशन्ना गुंडावार, सुनिता जतकर, अर्चना भरकाडे, शालिनी शिरसाट, संजय काळे, राधेश्याम चेले, भूमन्ना कसरेवार व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेचे सूत्रसंचालन सुभाष पारधी यांनी केले तर आभार विनोद क्षीरसागर यांनी मानले.

Web Title: Let teachers teach, students learn;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.