जाऊ तेथे खाऊ; लाचखोरीचे सर्वाधिक डाग पोलीस वर्दीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:38+5:30
चालू वर्षी ४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध घाटंजी ठाण्यात एक लाखाच्या लाचेप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २० जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या लेखापालाविरोधात पाच हजारांच्या मागणीसाठी महागाव ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. ६ एप्रिल रोजी भूमिलेख विभागाचा कर्मचारी जाळ्यात अडकला. त्याच्याविरुद्धही महागाव ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला. २५ मे रोजी पुसद येथे नगर परिषद अभियंत्याला पकडले, तर २० जुलै रोजी दारव्हा येथे दीड हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी अडकला.
विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २०२०च्या तुलनेत अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीच्या गुन्ह्यात घट झाली आहे. तीच परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यातही आहे. २०२०मध्ये जिल्ह्यात १५ गुन्हे दाखल झाले होते, तर २०२१ मध्ये १३ गुन्ह्यांची नोंद आहे. एकूण गुन्ह्यांची संख्या किंचित कमी झाली असली तरी मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहता लाचखोरीत पोलीसच पुढे असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी दाखल १३ पैकी पाच गुन्हे खाकी वर्दीविरोधात नोंदविले गेले आहेत. विशेष म्हणजे दाखल गुन्ह्यातील केवळ एका प्रकरणात अभियोगपूर्व मंजुरी मिळाली असून, उर्वरित १२ प्रकरणे तपासाधीन आहेत.
१ जानेवारी २०२० ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत अमरावती परिक्षेत्रात ७८ गुन्हे दाखल होते. याच कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरीच्या १५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. १ जानेवारी २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीच्या गुन्ह्यात काहीशी घट होऊन ही संख्या ६८वर आली. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेही दोनने कमी होऊन ते १३ एवढे नोंदविले गेले. मात्र या दोन्ही वर्षांत लाचखोरीच्या जाळ्यात सर्वाधिक पोलीसच अडकल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये पाच गुन्ह्यांमध्ये सहा पोलीस कर्मचारी अडकले होते. २०२०मध्ये पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लाचखोरीचे सहा गुन्हे दाखल झाले. यामध्ये ११ कर्मचारी अडकले, तर २०२१ मध्ये पाच गुन्ह्यांत पाच जण जाळ्यात सापडले.
चालू वर्षी ४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध घाटंजी ठाण्यात एक लाखाच्या लाचेप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २० जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या लेखापालाविरोधात पाच हजारांच्या मागणीसाठी महागाव ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. ६ एप्रिल रोजी भूमिलेख विभागाचा कर्मचारी जाळ्यात अडकला. त्याच्याविरुद्धही महागाव ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला. २५ मे रोजी पुसद येथे नगर परिषद अभियंत्याला पकडले, तर २० जुलै रोजी दारव्हा येथे दीड हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी अडकला. ११ ऑगस्ट रोजी राळेगाव ठाण्यात १२ हजारांच्या लाचेप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल झाला. तर २६ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहायक दुय्यम निबंधकाविरोधात पांढरकवडात गुन्ह्याची नोंद झाली. याच दिवशी काळीदौलत येथील मुख्याध्यापकाविरोधात वसंंतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला.
२८ ऑगस्ट रोजी पुसद पोलीस ठाण्यात खंडाळ्याच्या पोलीस नाईकाविरोधात २५ हजाराची लाच घेताना गुन्ह्याची नोंद झाली, तर ७ ऑक्टोबर रोजी लाडखेड पोलीस ठाण्यात दहा हजारांची लाच स्वीकारताना तंटामुक्ती अध्यक्षच जाळ्यात सापडला. २९ ऑक्टोबर रोजी पुसद शहर ठाण्यातील पोलीस हवालदाराला पाच हजाराची लाच घेताना पकडले. ५ डिसेंबर रोजी महागावमध्ये प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह खासगी इसमाविरोधात ५० हजाराच्या लाचेप्रकरणी गुन्हा नोंद झाला. यातील बीडीओ अद्यापही फरार आहे, तर ८ डिसेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक जाळ्यात सापडला.
दोन्ही वर्षी पहिला गुन्हा पोलिसावरच
- २०२१ मध्ये लाचखोरीचा पहिला गुन्हा ४ जानेवारी रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाला. एक लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात अडकला होता. २०२० मध्येही लाचखोरीचा पहिला गुन्हा यवतमाळ जिल्ह्यातच दाखल झाला होता. ६ जानेवारी २०२० रोजी राळेगाव पोलीस ठाण्यात एका पोलीस नायकासह खासगी इसमाला तीन हजारांची लाच घेताना पकडले होते. याच वर्षी दुसरा गुन्हाही पोलीस हवालदार विरोधातच नेर ठाण्यात दाखल झाला होता. यात सहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारासह पोलीस पाटील आणि खासगी इसम लाचेच्या जाळ्यात अडकला होता.
यंदा प्रथमच तलाठी राहिले जाळ्याबाहेर
पोलिसांप्रमाणे लाचखोरीच्या जाळ्यात तलाठी ही मोठ्या संख्येने अडकताना दिसतात. मात्र २०२१ या वर्षात आजवर एकाही तलाठ्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालेली नाही. २०१९ मध्ये सर्वाधिक सहा तलाठी लाचेच्या जाळ्यात सापडले होते. तर २०२० मध्ये तीन तलाठ्यांना रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.
लाचेची सर्वाधिक रक्कमही पोलिसांच्या नावे
- १ जानेवारी २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरीच्या १३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सात लाख रुपयांची लाच स्वीकारताना लोहारा ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकांसह दोन खासगी इसमांना पकडण्यात आले. तर ४ जानेवारी रोजी घाटंजीत पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या लाचेची रक्कम एक लाख रुपये होती. त्या पाठोपाठ प्रभारी गटविकास अधिकारी आणि मुख्याध्यापकाचा नंबर लागतो. गटविकास अधिकाऱ्याने ५० हजारांंची लाच मागितली होती. तर काळीदौलत येथील जाळ्यात अडकलेल्या मुख्याध्यापकाने ४० हजार मागितले होते.