चलो दिल्ली... साक्षरतेची गाडी निघाली दिल्ली दरबारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:58 AM2024-02-05T06:58:33+5:302024-02-05T06:58:57+5:30
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन दिवस राष्ट्रीय मेळावा
अविनाश साबापुरे
यवतमाळ : महाराष्ट्रसह देशभरात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. आता या कार्यक्रमात साक्षरतेचे धडे घेत असलेल्या प्रौढांचा दिल्लीत राष्ट्रीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातील चौघांची तिकीट प्रशासनाने पक्की केली आहे. राज्यातून एकंदर २० जणांचे पथक मेळाव्यात सहभागी होणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिल्लीच्या राष्ट्रीय बाल भवनात ६ आणि ७ फेब्रुवारीला हा मेळावा होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील प्रातिनिधिक असाक्षर आणि नवसाक्षर स्वयंसेवी शिक्षक यात सहभागी होत आहेत. ते ५ फेब्रुवारीलाच दिल्लीत दाखल होणार आहेत. नवसाक्षर आणि असाक्षरांचे अनुभव प्रकटीकरण, स्वयंसेवकांचे चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम या मेळाव्यात होणार आहेत.
या जिल्ह्यातून सहभाग
महाराष्ट्रातून पुणे, अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून या मेळाव्यात चार अधिकारी, दोन असाक्षर, दोन स्वयंसेवक, दहा कलाकार आणि दोन विशेष निमंत्रित अशा २० जणांचे पथक सहभागी होत आहे.
पथक सादर करेल साक्षरतेवर हिंदी पोवाडा
nमेळाव्यात कोल्हापूर डायटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार यांच्या नेतृत्वात दहा जणांचे कलापथक साक्षरतेवर हिंदी पोवाडा सादर करणार आहे.
nअभियानासाठी प्रेरणादायी ठरलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाकडून विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
राज्यातून तीन लाखांवर प्रौढांची नोंदणी
मोहिमेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील तीन लाख ३८ हजार ८० निरक्षर नागरिकांनी ‘उल्लास’ ॲपवर नावनोंदणीकेली आहे, त्यांना शिकविण्यासाठी तब्बल ४५ हजार ८६२ तरुणांनी पुढाकार घेतला आहे.