रस्त्यावर तरी जगू द्या हो!

By admin | Published: December 23, 2015 03:22 AM2015-12-23T03:22:18+5:302015-12-23T03:22:18+5:30

‘‘येवडुले येवडुले लेकरं हाये आमचे... रस्त्यावर बसून भाजीपाला इकतो न् जगवतो त्याह्यले...

Let's live on the street! | रस्त्यावर तरी जगू द्या हो!

रस्त्यावर तरी जगू द्या हो!

Next

भाजी विक्रेत्यांचा टाहो : जिल्हाधिकारी, एसपी, सीओंकडे हेलपाटे
यवतमाळ : ‘‘येवडुले येवडुले लेकरं हाये आमचे... रस्त्यावर बसून भाजीपाला इकतो न् जगवतो त्याह्यले... पण हे ट्राफिकवाले आमाले हाकलू हाकलू देऊन रायले.. धंदाच नाई कराचा तं मंग आमी जगाचं तरी कसं?’’
मळकट लक्तरातल्या शंभरेक महिलांचा हा टाहो मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दणाणत होता. एसपीसाहेब हजर नसल्याने भाजी विक्रेत्या महिला त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. अन् वाट पाहून पाहून आपल्या संतापाला वाचा देत होत्या.
यवतमाळ शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला विकणे हा त्यांचा धंदा. म्हटले तर धंदा अन् म्हटले तर सेवाही! पण पांढरपेशी खवैय्यांच्या ताटात ताजी भाजी वाढणाऱ्या या किरकोळ व्यावसायिकांचा रोजगार काढून घेतला जात आहे. तहसील चौक ते गोधनी रोड या परिसरात हे विक्रेते रस्त्यावर पोते अंथरून भाजीपाला विकतात. हा रस्ता मुळातच अरुंद. त्यांच्या रुंदीकरणाचे कामही सुरू झाले आहे. पण भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो म्हणून पोलिसांकडून विक्रेत्यांना वारंवार उठवून दिले जात आहे. पण इथे धंदा करायचा नाही तर जायचे कुठे? हा प्रश्न गोरगरीब भाजीविक्रेत्या महिलांना पडला आहे. हा प्रश्न त्यांच्या जगण्या-मरण्याचा सवाल बनला आहे. प्रशासन आपल्या ठिकाणी योग्य असले तरी या विक्रेत्यांच्या व्यवसायाचे काय? हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.
या भागात साधारण २०० व्यावसायिक भाजीपाला विक्री करतात. त्यात बहुसंख्य महिलाच आहेत. त्यातही बहुसंख्य वृद्ध आहेत. थकत्या वयातही त्या स्वावलंबी जगणे जगत आहेत. वाहतूक पोलिसांकडून त्यांना अश्लाघ्य भाषेत डिवचले जात आहे. दीपाली चिते ही भाजीविक्रेता महिला म्हणाली, ‘‘ट्राफिकवाला साहेब म्हंते का इथं बसशीन तं कुत्र्याच्या मौतीनं मरशीन. मी मन्लं बरंच व्हईन नं तुले, मी मेलो तं तकलीबच सरन तुई. तं थो ट्राफिकवाला बी कसा म्हंते... अवं इथं कायले मरतं? जा थ्या रेल्वेखाली मर. पैसे तरी भेटन...’’ दीपालीच्या या अनुभवातून वाहतूक पोलिसांची उद्धट वागणूक स्पष्ट होते. दीपालीसारखाच अनुभव हिराबाई मेश्राम, गुंफाबाई पाटील, रेखा देवतळे, सर्वेसता मेश्राम, वंदना अवथरे यांनाही आला आहे.
या भाजी विक्रेत्या महिलांनी गेल्या दोन महिन्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे दहा चकरा मारल्या. पण केवळ टोलवाटोलवीच सुरू आहे. कलावती बोरकर म्हणाल्या, ‘‘दोन मयन्यात धा चकरा झाल्या. कलेक्टर, पालकमंत्री, भावनाताई, मदनभाऊलेबी भेटलो. पण सारे म्हंते तुमाले जागा भेटन. आठवडी बाजारात जाऊन बसा. पण थ्या जागी इतल्या सालापासून धंदा करनारे लोकं आमाले खरस जागा देतीन का? तेथीसा वर्षाले चार-चार मर्डर होते अन् ह्ये म्हंते का तेथीसा बसा. आमी भाजी इकाची का सवताच खाची?’’
मंगळवारीही या भाजी विक्रेत्यांना वाहतूक पोलिसांनी उठविले. तेव्हा या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याऐवजी त्यांना नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला. या महिला नगरपरिषदेत धडकल्या तर मुख्याधिकारी सुटीवर असल्याचे कळले. शेवटी या महिलांचा जत्था पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात धडकला. तर तेथेही एसपी हजर नव्हते. बऱ्याच वेळानंतर त्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले. मात्र, हा प्रश्न माझ्या अखत्यारित येत नाही एवढेच बोलून पोलीस अधीक्षक निघून गेले. महिलांचे निवेदनही त्यांनी स्वीकारले नाही. कलेक्टरकडे गेलं का ते सीओकडे पाठवतात अन् सीओकडे गेलं का ते कलेक्टरकडे पाठवतात, अशी व्यथा महिलांनी मांडली.
यावेळी कलावती बोरकर, रेखा देवतळे, देवीबाई ताकसांडे, ज्योती सुटे, मंदा लभाने, महानंदा वासनिक, यशोधरा वाघमारे, कमलाबाई घाबर्डे, कांताबाई घायवन, बेबीबाई पानबुडे, संध्या लोखंडे, रत्नमाला वाळके, ललिता शेंडे, अंजू सुटे, लक्ष्मीबाई नागदेवे, यमुना भोयर, वंदना अवथरे, लखन गुप्ता आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

वृद्ध महिलांच्या वाट्याला भटकंती
भाजीपाला विक्रीचा किरकोळ व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. आपल्याला तहसील चौक ते गोदणी मार्गावरील नेहमीच्या परिसरात भाजी विक्री करू द्यावी, ही मागणी घेवून या महिला कधी जिल्हाधिकारी कार्यालय, कधी नगरपरिषद तर कधी पोलीस अधीक्षक कार्यालयात भटकंती करीत आहे. मात्र त्यांच्या वाट्याला निराशाच येत आहे. किंबहुना त्यांचे निवेदनही स्वीकारायला कोणताच अधिकारी तयार नाही. वाहतूक शाखेचे कर्मचारी तर त्यांना उद्धट भाषेत हाकलून लावत आहे. सीओ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवितात, तर जिल्हाधिकारी सीओंकडे पाठवित आहे.

Web Title: Let's live on the street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.