आधी लोकसभेची उधारी द्या नंतर विधानसभेचे बोला !
By admin | Published: July 12, 2014 01:46 AM2014-07-12T01:46:59+5:302014-07-12T01:46:59+5:30
आधी लोकसभ निवडणुकीतील प्रचाराची उधारी द्या नंतर आगामी विधानसभेचे बोला, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ...
यवतमाळ : आधी लोकसभ निवडणुकीतील प्रचाराची उधारी द्या नंतर आगामी विधानसभेचे बोला, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे आक्रमक भूमिका घेतली.
मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी येथे शासकीय विश्रामभवनात पार पडली. यावेळी आमदार शिशिर शिंदे, सरचिटणीस शिरीष सावंत, जयप्रकाश बावीस्कर, संपर्क प्रमुख श्रीधर जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. सुमारे दीड तास ही बैठक चालली. त्यातील पाऊण तास हा लोकसभेतील उधारीवरच्या चर्चेत गेला. लोकसभा निवडणुकीत वाशिमचे राजू पाटील राजे मनसेचे उमेदवार होते. त्यांच्याकडे निवडणूक काळातील उधारी आहे. बॅनर्स, आॅटोरिक्षा, लाऊड स्पिकर, वृत्तपत्र्यांच्या जाहिराती आदींचे पैसे देणे बाकी आहे. आधी थकबाकीची ही रक्कम द्या, नंतर विधानसभेच्या विषयावर चर्चा करू, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ नेतेही गोंधळून गेले. अखेर थकीत पैशाची तत्काळ व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन नेत्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्यात मनसेची स्थिती, पक्ष संघटन, आगामी विधानसभेच्या दृष्टीने किती मतदारसंघात पक्षाची ताकद आहे, कोण उमेदवार राहू शकतो, मनसेमध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नावे अशा विविध मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. विशेषत: यवतमाळ, वणी आणि राळेगाव या तीन विधानसभा मतदारसंघावर मनसेने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. यवतमाळ मतदारसंघात एका दाम्पत्यासह तब्बल सहा जणांनी दावा सांगितला आहे. तर भाजपामधून मनसेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एका डॉक्टरचे नाव मनसे कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे उघड केले.
वणी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकजूट दिसत होती. केवळ एकच नाव दावेदार म्हणून पुढे येत होते, परंतु आजच्या बैठकीत या भ्रमाचाही फुगा फुटला. मनसेच्या सहा नगरसेवकांनी आपली वेगळी चूल मांडत एका महिला पदाधिकाऱ्याचे नाव विधानसभेचे उमेदवार म्हणून पुढे केले. त्यामुळे प्रबळ दावेदाराला चांगलाच धक्का बसला. यावेळी या दोनही गटात शाब्दिक चकमक झाल्याचेही सांगितले जाते. राळेगाव मतदारसंघातून राष्ट्रसंतांच्या विचारावर चालणाऱ्या कार्यकर्त्याचे आणि दारूतील महसूल वसुलीचा दीर्घ अनुभव असलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून या बैठकीत चर्चिले गेले. केळापूर-आर्णी मतदारसंघातून एका अभियंत्याच्या नावावर चर्चा झाली. अन्य विधानसभा मतदारसंघातूनही अशीच काही नावे पुढे आली. (कार्यालय प्रतिनिधी)