शिक्षकांच्या देणगीतून विद्यार्थ्यांसाठी पुस्तकालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:12 PM2019-08-18T22:12:59+5:302019-08-18T22:14:38+5:30
कुणाला डॉक्टर व्हायचंय, तर कुणाला इंजिनिअर. पण, अभ्यासासाठी पुस्तके नाही. गरजू विद्यार्थ्यांची ही गरज शिक्षकांनी पूर्ण केली. देणगी उभी करून विद्यार्थ्यांसाठी जेईई, स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या विषयांचे पुस्तकालयच सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कुणाला डॉक्टर व्हायचंय, तर कुणाला इंजिनिअर. पण, अभ्यासासाठी पुस्तके नाही. गरजू विद्यार्थ्यांची ही गरज शिक्षकांनी पूर्ण केली. देणगी उभी करून विद्यार्थ्यांसाठी जेईई, स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या विषयांचे पुस्तकालयच सुरू केले. नेर येथील दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुरूजींनी सुरू करून दिलेल्या या पुस्तकालयामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच बसून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे.
या पुस्तकपेढीचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष वसंत पोहेकर, उपाध्यक्ष डॉ. बी.सी. लाड, सचिव विष्णूपंत गुल्हाने, सहसचिव मधुकर बोबडे, संचालक डॉ. मोहन शर्मा, डॉ. राजाभाऊ चोपडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्राचार्य उदय कानतोडे यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षकांनी उभी केलेली ही ग्रंथपेढी समृद्ध करण्यासाठीचाही संकल्प केला. प्रत्येकाने यासाठी योगदानाची तयारी दर्शविली आहे. पुढील काळात हे पुस्तकालय विविध स्पर्धात्मक परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांनी खचाखच भरलेले दिसणार आहे. विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी होण्याचे स्वप्न या पुस्तकालयाच्या माध्यमातून साकारले जावे, अशी अपेक्षा सर्वांना आहे. पुस्तकपेढीसाठी उपप्राचार्य के.पी. देशमुख, पर्यवेक्षक मनोज जिरापुरे, प्रा. किशोर राठोड, प्रा. चिंचोळकर, प्रा. प्रशांत बुंदे, प्रा. उज्ज्वला राऊळकर, प्रा. मनीषा बन्सोड, प्रा. सुनील गावंडे, प्रा. अरुण नरवडे, प्रा. प्रवीण मिसाळ यांचेही योगदान महत्त्वपूर्ण राहिले.