तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर तिघांचे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:02+5:30

परवाना निलंबित झालेल्यांमध्ये यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरातील बबलू गुप्ता यांचे कृषी कल्पतरु, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र व राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सोयाबीन बियाणे जिल्ह्याबाहेर कोपरगाव-शिर्डी पर्यंत नेऊन विकल्याचा ठपका गुप्ता यांच्या कृषी कल्पतरु केंद्रावर आहे.

Licenses of three agricultural centers revoked and three suspended | तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर तिघांचे निलंबित

तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर तिघांचे निलंबित

Next
ठळक मुद्देएका कृषी केंद्राला ताकीद : बोगस सोयाबीन, बनावट खत विक्रीचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बोगस आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे विकणाऱ्या तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर बनावट खत प्रकरणात तीन कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला.
परवाना निलंबित झालेल्यांमध्ये यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरातील बबलू गुप्ता यांचे कृषी कल्पतरु, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र व राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सोयाबीन बियाणे जिल्ह्याबाहेर कोपरगाव-शिर्डी पर्यंत नेऊन विकल्याचा ठपका गुप्ता यांच्या कृषी कल्पतरु केंद्रावर आहे. त्यामुळे त्यांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तर सुदर्शन व जाजू यांचा परवाना एक ते दोन महिन्यांसाठी निलंबित केला गेल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.
याशिवाय तीन कृषी केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. महागाव तालुक्याच्या काळीदौलत येथील गौरी शंकर कृषी केंद्रावर बोगस सोयाबीन बियाणे विक्रीचा ठपका ठेवण्यात आला. नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील कृहनिका कृषी केंद्र आणि दिग्रस तालुक्याच्या तिवरा येथील बावणे कृषी केंद्राचा परवाना बनावट रासायनिक खत विकल्याप्रकरणी रद्द करण्यात आला आहे.
कृषी प्रगती केंद्रात अनेक त्रुट्या
यवतमाळातील विलास बोगावार यांच्या कृषी प्रगती केंद्राला सक्त ताकीद देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या तपासणीत तेथे अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. मात्र त्या सौम्य स्वरूपाच्या होत्या. त्यातील बहुतांश त्रुट्यांची त्यांनी पूर्तता केली, साठा रजिस्टर भरले. त्यामुळे त्यांना केवळ ताकीद देण्यात आली.
जिल्हाभर बोगस सोयाबीन बियाणे विकले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यवतमाळातील ठोक विक्रेत्यांकडून हे बियाणे विकले गेले. काहींनी कृत्रिम टंचाई करून जादा दराने बियाणे विकले तर कुणी जिल्ह्याबाहेर कंपनीतून परस्पर बियाणे विक्रीसाठी पाठविले. या वृत्ताची दखल घेऊन कृषी विभागाने शहरात ठोक बियाणे विक्रेत्यांच्या दुकान व गोदामांची तपासणी केली होती.
परवाना रद्द व निलंबन केलेल्या प्रकरणात कृषी विभागाच्या तपासणीत अनेक गंभीरबाबी आढळून आल्या. साठा रजिस्टर न मिळणे, कागदपत्रे अपडेट नसणे, बियाणे खरेदी केल्याची कागदपत्रे उपलब्ध नसणे, जिल्ह्याबाहेर माल विकणे, उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारणे आदी गैरप्रकार आढळून आले.
बनावट रासायनिक खताचा भंडाफोड
कृषी विभागाने दिग्रस येथे बनावट रासायनिक खताची विक्री सुरू असल्याचा भंडाफोड केला होता. हे खत एसटी महामंडळाच्या पार्सल गाडीने गडचिरोली जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आणले जात होते व नामांकित खत म्हणून जादा दरात शेतकऱ्यांच्या माथी मारले जात होते. हे खत विकणारे दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.

यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक तक्रारी
यवतमाळ व आर्णीतील ठोक बियाणे विक्रेत्यांकडून जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यात बियाण्यांची विक्री केली गेली. जयस्वाल कृषी केंद्रातून यवतमाळ तालुका व परिसरात बियाणे विकले गेले. तेथूनच बियाणे न उगविल्याच्या सर्वाधिक तक्रारी शेतकऱ्यांनी नोंदविल्या.
आर्णीतून बियाणे थेट उमरखेड व परिसरापर्यंत
आर्णीच्या कृषी वैभव केंद्रातून उमरखेड व परिसरात सर्वाधिक बियाणे विक्री झाली व तक्रारीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

मीडियाच्या एन्ट्रीने दत्त चौकातून पथक माघारी
या तपासणीसाठी कृषी विभागाचे तत्कालीन मोहिम अधिकारी व दक्षता अधिकाऱ्यांचे पथक दत्त चौकातील जयस्वाल कृषी केंद्रावरही धडकले होते. मात्र त्याच वेळी तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाची चमू धडकल्याने कृषी विभागाने ही तपासणी नंतर करू असे म्हणून त्यावेळी कारवाई टाळली. परंतु नंतर या दुकानाची तपासणी झालीच नाही.
‘बीगबजेट’ पार्ट्याच तपासणीतून सुटल्या !
अशाच पद्धतीने आर्णी येथील कृषी वैभव या ठोक बियाणे विक्रेत्याचीही तपासणी केली गेली नाही. ‘बीग बजेट’ पार्ट्याच कृषी विभागाच्या तपासणीतून सुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या केंद्रांना अभय देण्यामागील ‘रहस्य’ गुलदस्त्यात आहे.

Web Title: Licenses of three agricultural centers revoked and three suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती