लेवा येथे आरोग्य पथक तळ ठोकून
By admin | Published: November 1, 2014 11:15 PM2014-11-01T23:15:15+5:302014-11-01T23:15:15+5:30
तालुक्यातील लेवा येथे डेंग्यूसदृश आजाराचे थैमान सुरू आहे. घराघरात रुग्ण दिसत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या तीन दिवसांपासून
महागाव : तालुक्यातील लेवा येथे डेंग्यूसदृश आजाराचे थैमान सुरू आहे. घराघरात रुग्ण दिसत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या तीन दिवसांपासून पथक येथे तळ ठाकून असून रुग्णांचे रक्त नमुने घेतले जात आहे. दरम्यान, गावात फवारणीसाठी आणलेल्या दोन्ही फॉगिंग मशीन सुरूच झाल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांनीच आता स्वच्छतेसाठी मोहीम हाती घेतली आहे.
महागाव तालुक्यातील लेवा येथे गेल्या १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. घराघरात रुग्ण असून काही जणांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार दिली होती. परंतु कुणीही दखल घेतली नाही. त्यानंतर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या तीन दिवसांपासून तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.सी. टारफे येथे तळ ठोकून आहेत. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदडे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाच्यावतीने रुग्णांचे रक्त नमुने घेतले जात आहे. दोन दिवसात ४० रुग्णांचे नमुने घेण्यात आले. अहवाल आल्यानंतर नेमका आजार कळणार आहे. तसेच हिवताप निर्मूलन विभागाचे कर्मचारी आर.आर. आकडे, वसंत लांडे हे गावात दाखल झाले आहे.
दरम्यान, आरोग्य पथक गावात असतानाही रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. केतकी प्रदीप देशमुख (१४) या बालिकेला नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डासांच्या निर्मूलनासाठी गावात फॉगिंग मशीन आणण्यात आले. मात्र मशीन सुरूच झाले नाही. त्यानंतर दुसरे मशीन आणले. तेही सुरू झाले नाही. त्यामुळे आता गावकरीच स्वयंस्फूर्तीने नाल्या व गटारांची साफसफाई करीत आहे.
आरोग्य यंत्रणेबद्दल गावकऱ्यांत प्रचंड रोष असून सुरुवातीला माहिती दिल्यानंतर आरोग्य पथक आले असते तर अशी स्थिती निर्माण झाली नसती, असा आरोप आता गावकरी करीत आहे.
गावात स्वच्छता अभियानासाठी किशोर खंदारे, किशोर देशमुख, रावसाहेब देशमुख, देवराव खंदारे, अनिल देशमुख, दत्ता फाळके, भाऊसाहेब देशमुख आदींच्या पुढाकारात गावकरी परिश्रम घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)