जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:35 PM2019-05-10T23:35:27+5:302019-05-10T23:35:49+5:30

तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

Life Authority's water scam broke out | जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली

जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली

Next
ठळक मुद्देहजारो लिटर पाण्याचा अपव्यय : भरउन्हाळ्यात रस्त्यावर पूर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. एकीकडे यवतमाळकर नागरिकांची बालटीभर पाण्यासाठी भटकंती होत असताना गोदनी मार्गावर मात्र भरउन्हाळ्यात रस्त्यावर पूर वाहत असल्याचे चित्र होते. उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव नागरिकांना आला.
गोदनी मार्गावर महानेटच्या भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मशीनने रस्त्याला व कडेला छिद्र पाडले जात आहे. शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच या मशीनने अचानक ३०० मिमीच्या प्रमुख जलवाहिनीला छिद्र पडले. त्यामुळे क्षणार्धात रस्त्यावर पाणी वाहू लागले. पाहता पाहता अवघ्या काही वेळात रस्त्यावर जणू गंगा अवतरली. पाण्याचे पाट पोलीस ठाण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहत आले. ऐन उन्हाळ्यात रस्त्यावरून पावसाळ्यासारखे पूर वाहत असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
विशेष असे जीवन प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर ही जलवाहिनी फुटली असताना त्यातून होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्राधिकरणाच्या अभियंते-कर्मचाऱ्यांकडून तातडीचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. पाण्याच्या या अपव्यय प्रकरणी प्राधिकरणाने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात महानेटच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र या कंत्राटदाराकडून अपव्यय झालेल्या हजारो लिटर पाण्याची किंमत प्राधिकरण वसूल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरते.
यवतमाळ शहरात अनेक भागात जलवाहिन्या लिकेज आहेत. कित्येक ठिकाणी तर नाल्यांमध्ये हे लिकेज असल्याने घाण पाणी त्यातून घराघरात पोहोचते. हे लिकेज थांबविण्यासाठी नागरिकांकडून प्राधिकरणाला कित्येकदा निवेदने देण्यात आली, विनंत्या करण्यात आल्या. मात्र लिकेजेस थांबले नाहीत. आजही त्यातून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. तर या फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी नागरिकांच्या घरात पोहोचते आहे. त्यामुळे आबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या थकीत वसुलीसाठी जोर देणारी प्राधिकरणाची यंत्रणा सेवा देताना मात्र ‘आमच्याकडे मनुष्यबळ नाही’ हे नेहमीचे उत्तर देताना दिसते. शुक्रवारी प्राधिकरणाला आपल्या कार्यालयासमोरील फुटलेल्या जलवाहिनीतून होणारा पाण्याचा अपव्यय तातडीने थांबविता आला नाही, यावरून प्राधिकरणाची यंत्रणा गलीबोळातील लिकेजेस खरोखरच किती तत्परतेने दुरुस्त करीत असतील याचा अंदाज येतो.

नागरिक नळावर, पाणी मात्र रस्त्यावर
यवतमाळकर जनता पाण्यासाठी भटकंती करीत आहे. अनेक मागास वस्त्यांना, शहराच्या टोकावरील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ-दहा दिवसातून एकदा नळ सोडले जात आहे. त्याचीही वेळ नक्की नाही. त्यामुळे नागरिकांना रात्री बेरात्री उठून नळावर नजर ठेवावी लागत आहे. अनेक भागात तर बकेटभर पाणी मिळविणेही कठीण झाले आहे. एकीकडे ही स्थिती असताना गोदनी रोडवर मात्र नेमकी त्याच्या उलट स्थिती पहायला मिळाली. तेथील जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. टंचाईचा सामना करणारे नागरिक पाण्याचा हा अपव्यय पाहून हळहळताना दिसले.

पाणीपुरवठा खंडित होणार
पाईप लाईन दुरुस्त होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे. महानेटच्या भूमिगत केबलिंगच्या कामामुळे गोधनी रोडवर २१ इंच मुख्य पाईपलाईन क्षतिग्रस्त झाली आहे. दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने निळोणा जलशुध्दीकरण केंद्राचे पंपिंग बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित राहणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी कळविले आहे.

Web Title: Life Authority's water scam broke out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.