आयुष्य फुलासारखे जगा, काट्यासारखे नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 09:43 PM2019-07-19T21:43:14+5:302019-07-19T21:44:12+5:30
एकाच फांदीवर फुलही उगवते आणि काटेही उगवतात. फुलाचे आयुष्य अल्प असले तरी ते इतरांना सुगंधीत करून जाते. काट्याचे जीवन दीर्घकाळ असले तरी ते सर्वांसाठी दु:खदायक ठरते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकाच फांदीवर फुलही उगवते आणि काटेही उगवतात. फुलाचे आयुष्य अल्प असले तरी ते इतरांना सुगंधीत करून जाते. काट्याचे जीवन दीर्घकाळ असले तरी ते सर्वांसाठी दु:खदायक ठरते. त्यामुळे माणसाने अल्प का होईना पण फुलासारखे जगावे, असे प्रबोधन नागपूर येथील गुरुद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धांगिणी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी मुख्त्येयार सिंगजी यांचे कीर्तन पार पडले. येथील ‘प्रेरणास्थळा’वर शुक्रवारी सकाळी हा आदरांजलीपर कार्यक्रम झाला.
यावेळी मुख्त्येयार सिंगजी यांनी गुरुग्रंथसाहीब, गुरुनानक, गुरुअर्जनदेवसिंगजी, भाई गुरुदास, संतकबीर यांच्या रचना सादर केल्या. ‘सोप्रभ सदा प्रमाणरख्खा’ गुरुअर्जनदेवसिंगजी यांच्या या श्लोकाने गुरुवाणी कीर्तनाचा प्रारंभ झाला. मानवी शरीर हे माणसाला मिळालेले सर्वात मोठे दान आहे. त्यामुळे प्रत्येकाने परमेश्वराचे ध्यान करावे, असे निरुपन यावेळी मुख्त्येयार सिंगजी यांनी केले. जीवनाविषयी भाष्य करताना संतकबीर यांचा ‘बौरहम काहे आवेंगे... आवन जाने हुकुमत से का... हुकूम बोजा समावेंगे’ हा दोहा बरेच काही सांगून गेला. एखादा विद्यार्थी शाळेत अनुत्तीर्ण झाला तर जीवनाचे एक वर्ष वाया गेल्याचे त्याला मोठे दु:ख होते. मात्र आयुष्यात चांगले वर्तन न ठेवल्यास संपूर्ण आयुष्य वाया जाते. मग असे आयुष्य वाया गेल्याचे दु:ख का वाटू नये ? चांगले कर्म करून जाणाऱ्यांची नेहमी आठवण केली जाते. मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या आदरांजली कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीतूनच हे लक्षात येते की त्यांचे जीवनध्येय अतिशय चांगले होते, अशा शब्दात मुख्त्येयार सिंगजी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांना या कीर्तनात मनमोहनसिंगजी आणि लखबीरसिंगजी यांनी साथसंगत केली. अॅड. प्रवीण जानी यांनी श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन केले.
आदिवासी विकास मंत्र्यांसह मान्यवरांची हजेरी
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी यवतमाळ येथे त्यांच्या समाधीस्थळावर गुरुबाणी कार्यक्रमाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजप नेते राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, एडिटर-इन-चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आर्टिस्ट विनोद शर्मा, डॉ. लव किशोर दर्डा, सोनाली लव दर्डा, अॅड. ए.पी. दर्डा, डॉ. ललित निमोदिया, भारत राठोड, डॉ. टी.सी. राठोड, दिनेश गोगरकर, सुरेश चिंचोळकर, डॉ. प्रताप तारक, प्रतीक राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.