पित्याचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलास जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 07:05 PM2023-03-18T19:05:10+5:302023-03-18T19:06:07+5:30
शेतीच्या वादावरून जन्मदात्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी आरोपी मुलाला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
संतोष कुंडकर
पांढरकवडा:(यवतमाळ) - शेतीच्या वादावरून जन्मदात्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी आरोपी मुलाला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नामदेव दत्तू उरवते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून तो झरी तालुक्यातील खापरी येथील रहिवासी आहे.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झरी जामणी तालुक्यातील खापरी येथील नामदेव दत्तू उरवते याचा त्याचे वडील दत्तू उरवते यांच्याशी शेत जमिनीच्या हिश्श्यावरून नेहमी वाद होत असे. २४ जुलै २०१९ रोजी रात्री दत्तू उरवते हे आपल्या घरी खाटेवर झोपून असताना रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास आरोपी मुलगा नामदेव उरवते तेथे आला. त्याचे त्याचे वडील दत्तू उरवते हे खाटेवर झोपून असताना त्याचे तोंडात कापडी बोळा टाकून वेळवाच्या काठीने डोक्यावर जोरदार प्रहार केले. यात काठीचे घाव वर्मी लागून त्यांचा मृत्यू झाला.
आरोपीचा मोठा भाऊ पंजाबराव दत्तू उरवते याने या घटनेची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर आरोपीविरुध्द भादंवि ३०२ अन्वये गुन्हयाची नोंद करून त्याला अटक केली. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर वणीचे तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी प्रकरण पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने एकुण १५ साक्षिदार तपासण्यात आले. मृताची पत्नी चंद्रभागा दत्तू उरवते ही घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असल्याने तिची साक्ष तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राहय मानण्यात आले. यावरून न्यायाधीश बी.बी. नाईकवाड यांनी आरोपी नामदेव उरवते याला भादंवि ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी शासकीय अभियोक्ता म्हणून अॅड. रमेश मोरे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार मारोती टोंगे व जमादार रमेश पिदुरकर यांनी कामकाज पाहिले.