जेवायला भाजी दिली नाही म्हणून मित्राचा खून केलेल्या युवकाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 09:36 PM2020-09-22T21:36:02+5:302020-09-22T21:38:15+5:30
मित्राचा खून केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मित्राचा खून केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजू सोमा नैताम (३५) असे आरोपीचे नाव आहे. तर राजेंद्र अंबादास मस्के असे या घटनेतील मृताचे नाव आहे.
ही घटना २ जुलै २०१८ ला आर्णी तालुक्यातील शेलूशेंदूरसनी गावात घडली होती. रात्री राजू नैताम याने राजेंद्र मस्केच्या घरी जाऊन जेवणाची मागणी केली. त्यावेळी पोळी मिळाली, मात्र भाजी नसल्याच्या कारणावरून भांडण झाले. त्याने राजेंद्रवर कुऱ्हाडीने वार करुन त्याचा खून केला. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला एलसीबी आणि नंतर आर्णी पीएसआय सचिन बोबडे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी फितूर झाला. परंतु उर्वरित साक्षीदार आणि डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरून येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.ए. रामटेके यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. दिलीप निमकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी विकास खंडारे यांनी सहकार्य केले.