आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे

By admin | Published: November 17, 2015 04:05 AM2015-11-17T04:05:44+5:302015-11-17T04:05:44+5:30

या गजलमधून जणू काही गजलनवाजांनी आपला संगीतमय प्रवास उलगडून दाखविला. मराठी गजलेला साता समुद्रापार

Life is the same, and this is the only drawback | आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे

आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे

Next

यवतमाळ :
आयुष्य तेच आहे, अन् हाच पेच आहे
तू भेटसी नव्याने, बाकी जुनेच आहे
तू प्रेम दे जगाला, मग ते तुझेच आहे
या गजलमधून जणू काही गजलनवाजांनी आपला संगीतमय प्रवास उलगडून दाखविला. मराठी गजलेला साता समुद्रापार सन्मान प्राप्त करुन देणारे पं. भीमराव पांचाळे यांची प्रकट मुलाखत रविवारी १५ नोव्हेंबरला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात झाली. सम्यक सृजन यवतमाळ प्रस्तुत गजलगौरव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नवोदित गजलकारांचा मुशायराही यावेळी सादर करण्यात आला.
जगदीश भगत यांनी पं. भीमराव पांचाळे यांची मुलाखत घेतली. त्यातून भीमराव पांचाळे यांनी संगीत जीवनातील अनेक चढउतार सांगून रसिकांची जिज्ञासा पूर्ण केली. ते म्हणाले, कष्टाशिवाय कोणीच प्रगती करीत नाही. म्हणून कष्टाला उगाळत बसू नये. संगीताचे प्राथमिक धडे मी गावकुसातून, निसर्गातून, आईवडील, कोरकूंची गाणी, महादेवाची गाणी आणि लोकगीतातून घेतली आहेत. भजने, जात्यावरच्या ओव्या यातून सुंदर निर्मळ स्वर मी ग्रहण केले. अमरावतीला शिकत असताना सुरेश भट जयस्तंभ चौकात रिक्षात बसून पहाडी आवाजात गजल गात होते. त्याचवेळी माझ्या जीवनाची दिशा ठरली.
सुरेश भटांच्या गजलांना चाली लावता-लावता बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिरात मी चांगलाच प्रसिद्धीस आलो. १९७२ साली सर्वप्रथम अकोला येथे ४५ श्रोत्यांसमोर एका वर्गखोलीत मैफल सादर केली. त्याच वर्षी नागपूर आकाशवाणीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत देशातून पहिला आलो. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेच नाही.
गरिबांच्या लग्नाला नवरी
गोरी काय काळी काय?
महागाईने पिचलेल्यांना
होळी काय दिवाळी काय?
रक्त लाल आहे सर्वांचे
कशास मग ही भेदभावना
संगळ्यांना मातीतच जाणे
कुणबी काय माळी काय?
ही गजल गाऊन त्यांनी सामाजिक भाष्य गजलमधून व्यक्त केले. सृजनाच्या प्रक्रियेतून कलावंत बाहेर पडला की त्याच्या कलेवर रसिकांचा अधिकार असतो. त्यामुळे आप सर्वांनी एकमेकांशी सलोख्याने वागले पाहिजे. माधव ज्युलियन आणि सुरेश भटांनीच मराठी गजलेला अमृतसिंचन दिले आहे. या क्षेत्रात मी पुढे असून तर जवळपास ४०० गजलकार
माझ्या संपर्कात आहेत असेही ते म्हणाले.
नवोदित गजलकारांसाठी कायमस्वरुपी कार्यशाळा स्थापन करुन मराठी गजल अधिक
प्रगल्भ करण्याची त्यांची मनिषा
आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विदर्भातील नवोदित गजलकारांचा मुशायरा झाला. यात आबेद शेख, गजानन दरोडे, डॉ. सुबोध निवाणे, प्रमोद संबोधी, प्रमोद चोबीतकर, विनय मिरासे, प्रा. सिद्धार्थ भगत, किशोर बळी, किरण मडावी, गजानन वाघमारे, मसूद पटेल, विद्यानंद हाडके, प्रफुल्ल भुजाडे, रमेश सरकटे, लक्ष्मण जेवणे, अनिल कोशे यांनी सहभाग नोंदविला.
हात तिचा मुद्दाम टाळला धरता धरता
चला म्हणालो त्रास कशाला मरता मरता
गजानन दरोडे यांच्या गजलेने अक्षरश: रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी धरती बळी खैरे हिने ‘मी किनारे सरकाताना पाहिले’ ही गजल तर प्रिया पाटील हिने
‘श्वास गजल निश्वास गजल जगण्याचा विश्वास गजल’ सादर केली. प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र खैरे कुुटुंबीयांतर्फे गजलनवाजांना भेट देण्यात आले. प्रा. रुद्रकुमार रामटेके यांचे ‘एक स्वप्न बौद्धमयचे’ या सिडीचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. दिवाळीच्या उत्तरार्धात पं. भीमराव पांचाळे यांची दिलखुलास मुलाखत आणि नवोदितांचा मुशायरा दिवाळीच्या फराळाने जड झालेल्या पोटांना गजलानंदाचा उतारा ठरला, हे नक्की. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

Web Title: Life is the same, and this is the only drawback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.