शिक्षणासाठी जीव धोक्यात
By admin | Published: July 7, 2014 11:47 PM2014-07-07T23:47:13+5:302014-07-07T23:47:13+5:30
दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थिनींना अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास सवलत आहे़ अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत प्रवास सवलत आहे़
‘स्कूल चले हम’ : मानव विकासच्या बसअभावी ट्रकने प्रवास
विलास ताजने - शिंदोला
दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थिनींना अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास सवलत आहे़ अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत प्रवास सवलत आहे़ परंतु शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेवर बस नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत ये-जा करण्यासाठी प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
राज्य शासनातर्फे अहल्यादेवी होळकर, मानव विकास योजनेंतर्गत मुलींसाठी एसटीने मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली़ गरीब, होतकरू मुलींना शिक्षण घेता यावे, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली़ परंतु वणी, शिरपूर, शिंदोला या मार्गाने धावणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे सदर मार्गावरील अनेक बस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या सुरू आहे, त्यांच्या वेळा विद्यार्थ्यांच्या उपयोगी नाही़ त्यामुळे चारगाव, सेलू, खांदला, कुर्ली, येनक, येनाडी आदी गावातील विद्यार्थ्यांना शिंदोला आणि शिरपूर येथील शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी जड वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ काही ट्रक चालक विद्यार्थ्यांसाठी शाळा ते गाव ये-जा करण्याची सोय करीत आहे़ आॅटोरिक्षा चालक विद्यार्थ्यांकडून अवाजवी प्रवास भाडे घेत असल्याने विद्यार्थी आॅटोने प्रवास करणे टाळतात़ परिणामी विद्यार्थी प्रवास भाडे न घेणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आदी मालवाहू वाहनाने शाळेत ये-जा करणे पसंत करतात़ यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ वणी आगाराने याची गांभीर्याने दखल घेऊन शिंदोला, शिरपूर मार्गावर शालेय वेळात लहान बस सुरू कराव्या, अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे़