जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका

By admin | Published: December 29, 2016 12:31 AM2016-12-29T00:31:16+5:302016-12-29T00:31:16+5:30

कुणाचाही आधार नसलेल्या गीताबाई भिकाजी इंगोले हिचा दीर्घ आजारामुळे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

Life was harassed, life was rescued | जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका

जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका

Next

नागरिकच बनले नातेवाईक : निराधार गीताबार्इंनी घेतला अखेरचा श्वास
अविनाश खंदारे  उमरखेड
कुणाचाही आधार नसलेल्या गीताबाई भिकाजी इंगोले हिचा दीर्घ आजारामुळे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कारासाठी उमरखेड शहरातील महिला व पुरुष एकत्र आले. कुणीही नातेवाईक नसलेल्या गीताबार्इंना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले. यातून उमरखेड शहरातील माणुसकी अद्याप जिवंत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होत्या.
उमरखेड शहरातील रहिवासी गीताबाई भिकाजी इंगोले (९५) हिला तीन मुले व एक मुलगी होती. त्यात पतीचे लवकरच निधन झाल्यामुळे गीताबाई निराधार झाल्या. त्यातच दोन मुले व एक मुलगी यांचाही अकाली आजारात मृत्यू झाला. त्यामुळे गीताबाईला जवळचे म्हणावे असे कुणीही या जगात नव्हते. एक मुलगा उरला तोही २४ तास दारूच्या नशेत. त्यामुळे तिला दररोज भिक्षा मागून उदरनिर्वाह केल्याशिवाय पर्याय नाही. अनेक वर्षे शहरात पायी फिरून भिक्षा मागून कसेतरी दिवस काढले. पण गेल्या दोन वर्षांपासून तिला चालता येत नव्हते. पायही टाकता येणे शक्य नव्हते. दिवसेंदिवस प्रकृती अधिकच ढासळत चालली होती. अशातच सोमवारी सकाळी गीताबाईची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे तिला उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचार केला गेला. परंतु प्रकृतीने साथ दिली नाही आणि रात्री ८ वाजता दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. जवळचे कुणीही नातेवाईक नाही. तिचा मुलगा तोही दारूच्या नशेत. त्यामुळे रात्रभर शासकीय रुग्णालयातच तिचा मृतदेह राहिला. ही बातमी नागरिकांच्या कानावर पडताच त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात धाव घेतली आणि लोकवर्गणी करून अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. कुणी रोख पैसे दिले तर कुणी साडी आणली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू नागरिकांनी गोळा केल्या. ही बातमी अष्टविनायक गणेश मंडळाच्या मुलांना समजल्यावर त्यांनी पैशाची व्यवस्था करून गीताबाईला नेण्यासाठी स्वर्गरथाची व्यवस्था केली. पाहता पाहता शासकीय रुग्णालयातील गर्दी वाढत गेली.
शंभर टक्के निराधार असलेल्या गीताबाईला शेवटपर्यंत राहायला घर नव्हते. पुसद रोडवर असलेल्या प्रताप चव्हाण यांच्या वर्कशॉपमध्ये तिला आसरा दिला होता. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत ‘ज्याचे नाही कोणी, त्याचे आहो आम्ही’, असे म्हणत शहरातील नागरिक गीताबाईचे नातेवाईक बनले. त्यांनी शासकीय रुग्णालयातूनच रितीरिवाजाप्रमाणे स्वर्गरथातून गीताबाईचा मृतदेह महागाव रोडवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत नेला व तिथे विधीवत अंत्यसंस्कार केले. यावेळी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. आजच्या धावपळीच्या जीवनात एकीकडे प्रत्येकाला आपआपल्या कामातून वेळ नाही. असे असताना उमरखेड येथील नागरिकांनी एक नवीन वाट समाजाला दाखविली आहे. यामध्ये सुरज दळवी, संजय कुबडे, माधव चौधरी, रमेश खंदारे, प्रताप चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, सुशील शेलार, राजू चव्हाण, रमेश इंगोले, अतुल खंदारे व अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Life was harassed, life was rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.