सुरेखाने अंधकारातून शोधला जीवन प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:55+5:302021-09-03T04:44:55+5:30

पुसद : लगतच्या वालतूर रेल्वे येथील शेतमजूर कुटुंबातील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या व डोळसांना लाजवेल अशा सुरेखा गजानन ...

The light of life beautifully discovered through the darkness | सुरेखाने अंधकारातून शोधला जीवन प्रकाश

सुरेखाने अंधकारातून शोधला जीवन प्रकाश

Next

पुसद : लगतच्या वालतूर रेल्वे येथील शेतमजूर कुटुंबातील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या व डोळसांना लाजवेल अशा सुरेखा गजानन पवार हिने शिक्षणाच्या जोरावर बँकेत नोकरी मिळवून अंधकारातून जीवनप्रकाश शोधला आहे. बँक ऑफ इंडियाच्या मुंबई येथील डी. एन. रोड शाखेत ती लिपिक म्हणून काम करीत आहे.

सुरेखाची जन्मत:च दृष्टी हरवली. जगात आल्यापासून तिच्यासमोर केवळ अंधार होता. ती सात वर्षांची असताना प्राथमिक शिक्षणासाठी सूर्यकांत जामगडे पाटील व तिचा आतेभाऊ विनोद गायकवाड यांनी पोफाळी ता. उमरखेड येथील अंध विद्यालयात दाखल केले. तिने शाळेत का टाकले म्हणून दगडावर डोके आपटले. परंतु तेथील शिक्षकांनी तिला आपलेसे करून ज्ञानार्जनाचे धडे दिले. नंतर तिने मागे वळून न पाहता सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आळंदी येथील जागृती अंध विद्यालयात पूर्ण केले. पोफाळी येथील सामान्य विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिवाजी विद्यालयातील कला शाखेतून बारावीचे शिक्षण घेऊन तिने बारावीत ७१ टक्के गुण मिळविले. नंतर मुंबई येथील शासकीय वसतिगृहात राहून कीर्ती काॅलेजमधून बीएची पदवी ७८ टक्के गुणांसह संपादन केली. मुंबई विद्यापीठातून एमएची पदवी ७० टक्के गुणांसह संपादन केली.

पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच २०१६ पासून तिने ‘आयबीपीएस’ या बँकींगच्या परीक्षेसाठी व्हिक्टोरिया मेमोरीयल स्कूलमध्ये क्लासेस लावले. सतत पाच वर्षे ती अपयशाचा सामना करीत होती. परंतु यश तिला हुलकावणी देत होते. दरम्यान, २०१८ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्याने तिला वसतिगृह सोडावे लागले. अशाही स्थितीत हार न मानता तिने काही दिवस मैत्रिणीकडे राहून तर काही दिवस पालकांसोबत राहून तब्बल तीन वर्षांच्या कठोर मेहनतीने बँकींग परीक्षेत यश संपादन केले. नुकत्याच लागलेल्या परीक्षेच्या निकालानंतर तिची बँकेत नियुक्ती झाली. तिची आई आशा, वडील गजानन व सुरेखा यांनी एकमेकांना आलिंगन देत आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.

स्वत:च्या पायावर उभे राहून तिने अंधकारमय जीवनाला प्रकाशवाट मोकळी करून दिली. जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या जोरावर तिने आयुष्यातील अंधारावर विजय मिळवला. आपला प्रकाश तिने स्वत: निर्माण केला. तिला बँकेत अधिकारी व्हायचे असल्याने हा संघर्ष सुरूच आहे. तिही त्याला जिद्दीने सामोरे जात आहे. कष्टाशिवाय काहीही मोठे नाही, हेच तिचा संघर्ष सांगतो.

बॉक्स

डोळसांनाही मिळाली प्रेरणा

दृष्टी असणाऱ्यांनाही सुरेखाच्या संघर्षातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. नोकरी करताना घरातही ती इतर मुलींप्रमाणे स्वत: सर्व कामे करते. दिव्यांग असलेल्या दोन मैत्रिणींसह कार्यालयापासून दूर असलेल्या बदलापूर येथे एका फ्लॅटमध्ये राहून दररोज स्वत:च्या स्वयंपाकासह सर्वच कामे करते. दररोज लोकलने ७० किलोमीटर जाणे व परत प्रवास करून स्वावलंबित्वाचे जीवन ती जगत आहे. या संघर्षात तिच्या कुटुंबीयांचा मोठा आधार मिळाला.

कोट

शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यातील कमजोरीलाच ताकद बनवून शिक्षण घेतले पाहिजे. जिद्द न सोडता सतत चालत राहिले की एक दिवस यश तुम्हांला नक्की मिळेल.

सुरेखा पवार

Web Title: The light of life beautifully discovered through the darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.