यवतमाळमध्ये वीज कोसळून सहा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:03 AM2020-03-31T03:03:22+5:302020-03-31T03:03:42+5:30
मृत सर्वजण कळंब तालुक्यातील असून परिसरातील जनावरे गोळा करुन शेतात बसवून उदरनिर्वाह करीत होते.
राळेगाव (जि. यवतमाळ) : शेतातील घरावर वीज कोसळून सहाजण ठार झाले. यात दोन दाम्पत्यांचा समावेश आहे. ही घटना राळेगाव तालुक्यातील गुजरी (नागठाणा) येथे रविवारी रात्री घडली. मृत सर्वजण कळंब तालुक्यातील असून परिसरातील जनावरे गोळा करुन शेतात बसवून उदरनिर्वाह करीत होते.
अभिमान विश्वनाथ अंबाडरे (६०), मंदाबाई अभिमान अंबाडरे (५०), लक्ष्मण बापूराव कोयरे (५०), सुभाष राजू नेहारे (२०, सर्व रा. निमगव्हाण), साहेबराव गुलाब देवनळे (४५), पिसाबाई साहेबराव देवनळे (४०, रा. कोडपाखिंडी) अशी मृतांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वीच ही मंडळी पत्र्याचे शेड टाकून सर्वजण राहत होते. सोमवारी सकाळी किशोर गोंडे हे शेतात गेले असता घटना निदर्शनास आली. पोलीस पाटील पांडुरंग घोटेकर यांना कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ राळेगाव पोलिसांना याची माहिती दिली. आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
१२ तासांनंतर घटना उघडकीस
रविवारी रात्री ७ ते ९ या वेळात पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. त्या दरम्यान वीज कोसळून हे सहाही जण मृत्यूमुखी पडले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शेत रस्त्याला लागूनच आहे. मात्र जोरदार पाऊस आणि अंधारामुळे तब्बल १२ तासांनी ही घटना उघडकीस आली.