‘आयएएस’प्रमाणे गुरुजींनाही देणार प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा नवा पायंडा

By अविनाश साबापुरे | Published: May 28, 2024 07:41 PM2024-05-28T19:41:52+5:302024-05-28T19:49:16+5:30

मार्च २०२३ मध्ये झालेल्या अभियोग्यता परीक्षेतून यवतमाळ जिल्हा परिषदेला २४६ नवे शिक्षक मिळालेले आहेत.

Like 'IAS', teacher will also be given training, Zilla Parishad's new step: teaching, administration and yoga will also be taught!  | ‘आयएएस’प्रमाणे गुरुजींनाही देणार प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा नवा पायंडा

‘आयएएस’प्रमाणे गुरुजींनाही देणार प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा नवा पायंडा

यवतमाळ : खडतर अभ्यासानंतर आयएएस झालेल्या उमेदवारांनाही प्रशिक्षण देऊनच नियुक्त केले जाते. आता तोच कित्ता जिल्हा परिषदेच्या गुरुजींच्या नियुक्ती प्रक्रियेतही राबविला जाणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यात नियुक्त झालेले शिक्षक येत्या एक जुलैपासून प्रत्यक्ष शाळेत अध्यापन सुरु करणार आहेत. परंतु, तत्पूर्वी या सर्व उमेदवारांना शिक्षकी पेशाबाबत नव्याने प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

मार्च २०२३ मध्ये झालेल्या अभियोग्यता परीक्षेतून यवतमाळ जिल्हा परिषदेला २४६ नवे शिक्षक मिळालेले आहेत. त्यात २३५ शिक्षक हे मराठी माध्यमाच्या शाळांवर जाणार आहेत. तर ११ शिक्षक उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये अध्यापन करणार आहेत. त्यांना पंचायत समित्याही देण्यात आलेल्या आहेत. १ जुलैपासून नवे शैक्षणिक सत्र सुरु होताच त्यांना प्रत्यक्ष वर्ग अध्यापन करावे लागणार आहे. परंतु, तत्पूर्वी या सर्वच शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रशिक्षित केले जाणार आहे.

हे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे. १० ते १९ जूनपर्यंत पहिला टप्पा तर २० ते २९ जूनपर्यंत प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. निळोणा परिसरातील दीनदयाल प्रबोधिनी येथे हे निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण चालणार आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ शहरातील रहिवासी असलेल्या शिक्षकांनाही प्रशिक्षण कालावधीत घरी न जाता प्रशिक्षण स्थळीच निवासी राहावे लागणार आहे. या प्रशिक्षणातून तावूनसुलाखून निघालेल्या नव्या शिक्षकांच्या हातून उत्तम विद्यार्थी घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रशिक्षित झालेल्या शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षण कशासाठी?
यूपीएससी परीक्षेसाठी जीवापाड अभ्यास करणारेच उमेदवार पुढे आयएएस होतात. तरीही या उमेदवारांना मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षण दिल्यानंतरच नियुक्त केले जाते. शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य सुदृढ कसे ठेवावे, प्रशासनाचा गाढा कसा हाकावा आदी बाबी त्यात शिकविल्या जातात. त्याच धर्तीवर नव्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशिक्षण देणार आहे. परंतु, शिक्षकांनी यापूर्वीच डीएड करताना अध्यापनाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. तर स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताही सिद्ध केली आहे. तरीही त्यांना परत प्रशिक्षण का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रशिक्षणात काय शिकविणार?
या निवासी प्रशिक्षणात शिक्षकांना नव्या पद्धतीच्या अध्यापनाबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून प्रात्यक्षिकही करवून घेतली जाणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, अधिष्ठाता त्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासोबतच मानसिक आरोग्यही उत्तम राखता यावे म्हणून योगासने करवून घेतली जाणार आहे. तर जिल्हा परिषद, तसेच शाळेतील प्रशासकीय कामकाजाचीही शिक्षकांना ओळख करवून दिली जाणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागासह विविध विभागातील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या उमेदवारांनी पदवी घेऊन बराच कालावधी लोटला आहे. डीएड होऊनही काही वर्षांचा गॅप गेलेला आहे. इतक्या वर्षानंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाऊन त्यांना अध्यापन करावे लागणार आहे. त्यामुळे जुन्या ज्ञानाची उजळणी करून देणे आवश्यक आहे. तसेच अध्यापनासोबतच त्यांना प्रशासनाचीही तोंडओळख व्हावी, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
- प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), यवतमाळ
 

Web Title: Like 'IAS', teacher will also be given training, Zilla Parishad's new step: teaching, administration and yoga will also be taught! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक