साखर घोटाळ्यात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
By admin | Published: February 27, 2015 01:38 AM2015-02-27T01:38:34+5:302015-02-27T01:38:34+5:30
पुरवठा विभाग व काही सक्षम अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०१२ मध्ये साखर नॉमिनीने रास्त भाव दुकानदारांना मासिक कोट्याची साखर वितरित न करता
उमरखेड : पुरवठा विभाग व काही सक्षम अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०१२ मध्ये साखर नॉमिनीने रास्त भाव दुकानदारांना मासिक कोट्याची साखर वितरित न करता सर्व नियम ढाब्यावर बसवून १४ लाख १५ हजार रुपये किमतीची ७६५ क्विंटल साखरेची अफरातफर केली. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार थोरात व नॉमिनी शैलेश सुरोशे या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तरी देखील याप्रकरणी कसून पोलीस चौकशी झाल्यास पुरवठा विभागातील काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
हा साखर महाघोटाळा अचानकपणे घडलेला नसून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जूनपासून डिसेंबर २०१२ पर्यंत हा प्रकार सुरू होता. शुगर नॉमिनी शैलेश सुरोशे याच्याकडून होत असलेल्या घडामोडी व गैरव्यवहारात पुरवठा विभागातील स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहात होते. शुगर नॉमिनीच्या गैरव्यवहाराला वरिष्ठांनी विविध पायबंद घातला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाला नसता.
महागाव तालुक्यातदेखील ५०० क्विंटल साखर घोटाळाप्रकरणी संबंधित नॉमिनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याच नावावर उमरखेड तालुक्यातही साखर घोटाळा उघडकीस येतो. याचा अर्थ याबाबतचे धागेदोरे जिल्हा पातळीवर वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याचा निष्कर्ष निघत आहे. या घोटाळ्याबाबतचा अहवाल पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा यंत्रणेकडे पाठवूनही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याची बाब समोर येत आहे.
सदर शुगर नॉमिनीच्या संशयास्पद हालचालीबाबत स्वस्त धान्य दुकानदारांनी ओरड केल्यानंतर स्थानिक पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविलेल्या अहवालाची दखल न घेतल्यामुळे शेवटी हे प्रकरण विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचले आणि या घोटाळ्याचे स्वरूप उघड झाले. आता दोघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत दोषींची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडू शकते. (प्रतिनिधी)