जुगार क्लब-अड्ड्यांवर धाडी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:00 AM2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:27+5:30
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी रानडे येथे आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला या अवैध धंद्यांबाबत जाब विचारला. ‘लॉकडाऊनमध्येही जुगार क्लब-अड्डे बहरलेलेच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी घेतली असून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊन असूनही यवतमाळ शहरात बहरलेले जुगार क्लब-अड्डे तत्काळ शोधा आणि तेथे धाडी घाला, असे आदेश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी येथे दिले.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी रानडे येथे आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला या अवैध धंद्यांबाबत जाब विचारला. ‘लॉकडाऊनमध्येही जुगार क्लब-अड्डे बहरलेलेच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी घेतली असून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. संचारबंदी लागू आहे, पोलीस रस्त्यावर आहेत असे असताना जुगार क्लब-अड्डे चालतातच कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या अड्ड्यांवर खेळणारे कितीही प्रतिष्ठीत असतील तरी त्यांना हातकड्या घाला, गनिमीकाव्याने धाडी घाला, असे आदेश महानिरीक्षकांनी दिले. रानडे यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाडींची योजना आखणे सुरू केले आहे. लगतच्या भविष्यात आकस्मिकपणे या धाडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु बहुतांश जुगार क्लब व अड्ड्यांशी स्थानिक संबंधित काही पोलिसांचे सलोख्याचे संबंध असल्याने या धाडी खरोखरच किती प्रामाणिकपणे घातल्या जातात, यावर या धाडींचे यश अवलंबून आहे. एखादवेळी खानापूर्ती करून अर्थात चार-दोन चिल्लर माणसे पकडून व काही रक्कम दाखवून महानिरीक्षकांच्या आदेशाची आपल्या सोईने अंमलबजावणी केली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या धाडींमधून पोलिसांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत की नाही हे स्पष्ट होणार आहे.
बुधवारी डाव रंगलाच नाही, नव्या जागेचा शोध
सहसा सकाळी ११ वाजतापासून बहुतांश क्लब व अड्ड्यांवर जुगाराचा डाव सुरू होतो. परंतु बुधवारी ‘लोकमत’ने या अड्ड्यांचा पर्दाफाश केल्याने खेळणाऱ्यांची दाणादाण झाली. सकाळपासूनच या खेळणाºयांचे एकमेकांना फोन सुरू झाले. बातमी लिक झाली कशी, राजकीयांमधील वाद, धान्य विक्रीआड जुगार व पोलिसांशी बाचाबाची ही आतील माहिती बाहेर गेलीच कशी? यावर सायंकाळी रेस्टहाऊस परिसरात चिंतन झाले. त्यातच महानिरीक्षकांनी धाडीचे आदेश दिल्याने बुधवारी जुगाराचा डाव भरलाच नाही. पोलिसांकडून धाडी पडण्याची भीती या जुगाºयांना आहे. त्यामुळे आता डाव रंगविण्यासाठी नव्या जागेचा शोध घेतला जात आहे. जागा कोणती, पार्किंग कुठे करावी याची सुरक्षितता तपासली जात आहे.
कुणी झाले कोट्यधीश, कुणी झाले कंगाल
जुगाराच्या या वाईट सवईने कुणी कंगाल झाले तर कुणाला आत्महत्या कराव्या लागल्या. याच जुगारात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका लोकप्रतिनिधीला दोन कोटींचा फायदा झाला. तर विमा कवच पुरविणाºया एकाला एक कोटींचे नुकसान झाले. त्याचा मुलगाही ४० लाख हारला. अखेर त्याला २० टक्के व्याजाने (मासिक सहा लाख) ३० लाख रुपये उधार घ्यावे लागले. तडजोडीअंती हे व्याज अर्ध्यावर आले. अशाच पद्धतीने या जुगाराने कित्येकांना बरबाद केले आहे. कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष करून अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणारी संबंधित पोलीस यंत्रणा मात्र यातून खिसे गरम करीत आहे.