स्वतंत्र धर्मासाठी लिंगायत महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:35 PM2018-01-28T21:35:41+5:302018-01-28T21:36:09+5:30
पूर्वजांचा समृद्ध वारसा, समाजाची स्वतंत्र अस्मिता जपत रविवारी लिंगायत समाजबांधवांनी यवतमाळातून राज्यव्यापी एल्गार पुकारला. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी जिल्हाकचेरीवर महामोर्चा धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पूर्वजांचा समृद्ध वारसा, समाजाची स्वतंत्र अस्मिता जपत रविवारी लिंगायत समाजबांधवांनी यवतमाळातून राज्यव्यापी एल्गार पुकारला. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी जिल्हाकचेरीवर महामोर्चा धडकला. हजारोंच्या संख्येने आलेल्या समाजबांधवांनी लक्ष वेधून घेतले.
येथील समता मैदानात सकाळपासूनच महाराष्ट्रासह विविध राज्यातील लिंगायत समाजबांधव उपस्थित झाले. ‘शरणू शरणार्थी’ म्हणत एकमेकांच्या भेटी घेतल्या. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या छत्राखाली एकवटलेल्या ४८ संघटनांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात मोर्चाला प्रारंभ झाला.
महामोर्चात सर्वात पुढे महात्मा बसवेश्वरांचा रथ होता. या रथातील संत बसवेश्वरांचा अर्धाकृती लक्षवेधी पुतळा जणू मोर्चाचे दिशादर्शक होते. नेतृत्व होते. सर्वात पुढे महिला, त्यानंतर पुरुषांची रांग अशा पद्धतीने मोर्चाच्या मार्गक्रमणाची रचना करण्यात आली होती. डोक्यावर मी लिंगायत लिहिलेल्या भगव्या टोप्या आणि हाती जय लिंगायत लिहिलेले पांढरे झेंडे घेतलेले मोर्चेकरी लक्षवेधी ठरले. वाहतूकीला अडथळा होऊ नये म्हणून तीन-तीन जणांच्या रांगा होत्या. हा मोर्चा समता मैदानात परतला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांनी हजेरी लावली. हंसिका तोडकरी हिने मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोक मेनकुदळे, अॅड. अविनाश भोसीकर, नीलेश शेटे, मंगेश शेटे, धर्मेंद्र पुजारी, आनंद कर्णे, राजेश विभुते, डॉ. जयेश हातगावकर, कल्पना देशमुख, अर्चना जवसकर, दीपक धारणे, बबन झाडे, शुभांगी हातगावकर आदींची महामोर्चात उपस्थिती होती.
प्रेतसंस्कार विधीसाठी दहा एकर जागा द्या
वैशिष्ट्यपूर्ण प्रेतसंस्कार विधीसाठी यवतमाळ येथे दहा एकर जागा द्यावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आले. यावेळी अॅड. अविनाश भोसीकर, डॉ. अशोक मेनकुदळे, डॉ. किशोर मांडगावकर, संजय तोडकरी, गिरीश गाढवे, सदानंद बिच्चेवार, अभिजित हातगावकर, अशोक मुक्तापुरे, पद्मश्री हातगावकर, शिल्पा बेगडे, सीमा केळकर यांचा समावेश होता.