बँकग्राहकांना ‘लिंक फेल’चा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:08 PM2018-02-02T22:08:52+5:302018-02-02T22:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव(देवी) : मागील चार दिवसांपासून लिंक फेल असल्याने विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेच्या सावर शाखेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. पर्यायी व्यवस्था केली असली तरी अनेक ग्राहकांना तांत्रिक अडचणीमुळे पैसा उपलब्ध होत नाही. वरिष्ठांकडून मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही.
जवळपास २५ गावे या बँकेशी जोडण्यात आलेली आहे. यात सावर, कापरा, आसोला, गळव्हा, राणीअमरावती, आसेगाव(देवी), यावली या मोठ्या गावांचा समावेश आहे. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यासह विविध प्रकारचे खातेदार या बँकेचे आहेत. तीन दिवसांपासून लिंक नसल्याने ग्राहकांना येरझारा माराव्या लागत आहे. आजारपण, शेती साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असतानाही या बँकेतून विड्रॉल मिळत नाही. कापरा, आसोला, गळव्हा या गावांसाठी असलेल्या यूएसबीमशीन बँकेत आणून व्यवहार केले जात आहे. मात्र आधार लिंक नसलेले, जोडखाते आदी प्रकारच्या ग्राहकांना या मशीनद्वारे रक्कम मिळत नाही. शिवाय दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध होत नाही. दुसरीकडे या मशीन बँकेत आणल्याने कापरा, आसोला, गळव्हा या गावातील नागरिकांना बँकेत हलपाटे मारावे लागत आहे. बँकेत ग्राहकांची गैरसोय होत असताना व्यवस्थापक मात्र यवतमाळहून कारभार सांभाळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.