दिवस उजाडण्यापूर्वीच मिळतो दारूचा घोट, पांढरकवडा तालुक्यात पहाटे ५ वाजतापासून उघडतात दारू दुकाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:17+5:302021-09-02T05:31:17+5:30

पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत चार तालुक्यांचा कार्यभार येतो. त्यात राळेगाव, मारेगाव, झरी, पांढरकवडा या तालुक्याचा समावेश आहे. ...

Liquor is available before dawn, Liquor shops open from 5 am in Pandharkavada taluka, neglected by state excise department | दिवस उजाडण्यापूर्वीच मिळतो दारूचा घोट, पांढरकवडा तालुक्यात पहाटे ५ वाजतापासून उघडतात दारू दुकाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

दिवस उजाडण्यापूर्वीच मिळतो दारूचा घोट, पांढरकवडा तालुक्यात पहाटे ५ वाजतापासून उघडतात दारू दुकाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

Next

पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत चार तालुक्यांचा कार्यभार येतो. त्यात राळेगाव, मारेगाव, झरी, पांढरकवडा या तालुक्याचा समावेश आहे. त्यात ३३ देशी दारूची दुकाने, तीन वाईन शॉप व बीअर शॉपी, ६१ वाईनबारचे परवाने आहेत. शिवाय अनेक ग्रामीण भागात काही विनापरवाना देशी दारूची दुकाने आहेत. पांढरकवडा तालुक्याचा विचार केल्यास इतर तालुक्याच्या तुलनेत दोन्ही प्रकारच्या दुकानांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तसेच काही ढाब्यावर विनापरवाना देशी दारू विक्री होत आहे. परवानाधारक देशी दारू व वाईनशॉप या दोन्ही गटात मोडणाऱ्या दारू व्यावसायिकांचा सर्वाधिक संबंध राज्य उत्पादन शुल्क विभागाशी येतो. परवान्यांपासून तर दुकानात येणारा माल आणि त्यानंतर होणाऱ्या विक्रीचा लेखाजोखा शॉपधारकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षणवेळी सादर करावा लागतो. राज्य शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक कर दारूच्या विक्रीतून जातो, हे सर्वश्रुत आहे. कागदोपत्री बऱ्याच बाबी या उत्पादन शुल्क विभागाशी संबधित असतात. पांढरकवडा तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यातील विविध भागांमध्ये देशी दारूचे अनेक दुकाने पहाटेपासून उघडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दिवस उजाडण्यापूर्वीच दारूचा घोट घेणाऱ्यांची संख्याही त्यामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसातील केवळ १८ तास केव्हाही पांढरकवडा तालुक्यात दारू सहज उपलब्ध होत असल्याने महिन्याकाठी या व्यवसायातील उलाढाल कितीतरी लाखोंच्या घरात आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमित नियमानुसार देशी दारू विक्री सकाळी ८ ते सायंकाळी १० पर्यंत तर वाईनशॉप सकाळी १० ते सायंकाळी १० पर्यंत व बार सकाळी ११ ते रात्री ११.३० वाजता उघडायला हवेत. दरम्यान, कोरोना काळापासून याही नियमात व वेळात विविध शासनाच्या आदेशानुसार बदल करण्यात आला. त्यानुसार देशी दारू विक्री, वाईन शॉप व बार सकाळी ८ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत उघडायला हवेत. १० नंतर ही दुकाने बंद करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येते. परंतु पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला गुंगारा देऊन तालुक्यातील देशी दारूची दुकाने पहाटे ५ वाजतापासून सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत बिनदिक्कत सुरू राहत आहेत.

कोट : पांढरकवडा तालुक्यात वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अशा बार व देशी दारू दुकानचालकांवर ठोस कार्यवाहीचे अभियान लवकर राबविण्यात येईल. नागरिकांच्या याबाबत तक्रारी असल्यास त्या द्याव्यात, त्याची लगेच दखल घेतली जाईल.

डी.पी.वरठी, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा विभाग.

Web Title: Liquor is available before dawn, Liquor shops open from 5 am in Pandharkavada taluka, neglected by state excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.