दारू विक्री परवाना देऊ नये
By admin | Published: May 7, 2017 01:02 AM2017-05-07T01:02:14+5:302017-05-07T01:02:14+5:30
राज्य मार्गावरील बंद झालेली दारु दुकाने पुसदलगतच्या श्रीरामपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट काहींनी घातला आहे.
श्रीरामपूरच्या नागरिकांचे निवेदन : गावातील शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राज्य मार्गावरील बंद झालेली दारु दुकाने पुसदलगतच्या श्रीरामपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट काहींनी घातला आहे. अशा दारू दुकानांना परवानगी देऊ नये अशी मागणी श्रीरामपूर येथील नागरिकांसह शेकडो महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्रीरामपूर हे नागपूर-नांदेड आणि परभणी राज्यमार्गालगत आहे. या राज्यमार्गावर देशी दारूचे दुकान होते. परंतु ते न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले. परंतु आता दारु विक्रेता राज्य मार्गापासून ५०० मीटर बाहेर दारु दुकान श्रीरामपूर परिसरात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली करीत आहे. या परिसरात दोन शाळा असून, रहिवासी वस्ती आहे. दारू दुकान लावण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. सदर निवेदन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीला देण्यात आले. या निवेदनावर अशोक गायकवाड, संजय वाठोरे, दिगंबर साळवे, नयना गायकवाड, पंचफुला जाधव, पूजा उत्तरवार, लता उत्तरवार, संगीता धुळधुळे, मिरा खंदारे, अनिल देशमुख, पुष्पा देशमुख यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यात महिलांची संख्या मोठी आहे.