सरपंचपदाच्या आरक्षणामुळे गावपुढाऱ्यांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:12+5:30
या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे यांनी पुढाकार घेतला आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यात ६१ पैकी ३० ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. अनेक मातब्बर गावपुढाऱ्यांच्या गावात सरपंचपद महिलांसाठी आरक्षित निघल्याने अनेकांचा हिरमोड झाला. परिणामी आपलीच सत्ता ग्रामपंचायतवर राहावी, यासाठी गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
परसोडी (बु.) ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले. त्यामुळे विद्यमान सरपंच तथा बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप यांना महिलांच्या खांद्यावर गावाची धुरा द्यावी लागणार आहे. या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे यांनी पुढाकार घेतला आहे. किन्हाळाचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक सुदाम पवार यांच्या गावात सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले. त्यामुळे ते आपल्या कुंटुंबातील महिला सदस्याला समोर करण्याची शक्यता आहे.
यासोबतच उमरी, धोत्रा, थाळेगाव, देवनळा, डोंगरखर्डा आदी गावातही सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले. त्यामुळे याठिकाणी वास्तव्यात असणाऱ्या तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या गावपुढाऱ्यांवर मात्र घरी बसण्याची वेळ आली आहे. असे असले तरी, महिलांना समोर करुन ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे सावरगाव या महत्वाच्या गावात सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गात निघाल्याने याठिकाणी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अनेक नेते तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडताना दिसतात. परंतु स्वत:च्या गावात ते किती प्रभाव टाकतात, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.