यवतमाळच्या गुन्हेगारी टोळी सदस्यांची यादी अखेर तयार
By Admin | Published: January 25, 2017 12:15 AM2017-01-25T00:15:32+5:302017-01-25T00:15:32+5:30
शहरातील संघटित गुन्हेगारी ठेचून काढण्याचा निर्धार नवे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी व्यक्त करताच
एसपींना सादर करणार : संघटित गुन्हेगारीला घालणार प्रतिबंध
यवतमाळ : शहरातील संघटित गुन्हेगारी ठेचून काढण्याचा निर्धार नवे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी व्यक्त करताच पोलिसांनी यवतमाळातील गुन्हेगारी टोळी सदस्यांची संपूर्ण यादीच तयार केली आहे. ही यादी एसपींना सादर केली जाणार असून नंतर या संबंधी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होणार असल्याची माहिती आहे.
एम. राज कुमार यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवस जिल्ह्याचा व येथील गुन्हेगारीचा अभ्यास केला. यवतमाळचा क्राईम रेट वाढल्याचे व येथे संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणूनच त्यांनी सर्व प्रथम ही संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे ठेचून काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत एसपींनी सुतोवाच करताच इकडे पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी शहरातील प्रमुख दोन टोळ्यांच्या सदस्यांची यादी तयार केली आहे. याशिवाय इतरही लहान-मोठ्या टोळ्या व त्यांचे सदस्य रेकॉर्डवर घेण्यात आले आहे.
ही यादी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना सादर केली जाणार असून त्यानंतर कारवाईची नेमकी दिशा ठरविली जाणार आहे.
उपरोक्त टोळी सदस्यांच्या कारवायांना कायद्यातील कोणत्या कलमान्वये प्रतिबंध घातला जाऊ शकतो, याची चाचपणी सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. यातील पोलीस दप्तरी ‘हिस्ट्रीशिटर’ म्हणून नोंद असलेल्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काळातच कारवाईचा इंगा दाखविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)