लहान मुले ठरत आहेत कोरोना स्प्रेेडर; म्हाताऱ्या आजी-आजोबांसह नातेवाईकांनाही कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 07:00 AM2021-05-07T07:00:00+5:302021-05-07T07:00:07+5:30
Coronavirus in Yawatmal पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत.
योगेश पडोळे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत. अशातच आई-वडिलांपैकी कुण्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील लहान मुलांना बाधा होऊ नये, म्हणून शेजारी किंवा नातेवाइकांकडे पाठविले जात आहे; पण ही लहान मुलेच कोरोना स्प्रेडर ठरत असल्याने ‘पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करून मोकळे होऊ नका, त्यांना सोबतच ठेवून त्यांचीही काळजी घ्या,’ असे आवाहन वैद्यकीयतज्ज्ञांकडून केले जात आहे.
कोरोनामुळे माणूसच माणसापासून दूर जायला लागला, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात भीतीपोटी अनेकांना माणुसकीचा विसर पडला आहे. कोरोना हा आजार इतर आजारांप्रमाणेच बरा होणारा असून एकमेकांना आधार देऊन कोरोनावर मात करण्याची गरज आहे; पण सध्या समाजात विचित्र प्रकार घडताना दिसून येत आहे. तालुक्यातील काही आई-वडील आपला मुलगा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा योग्य उपचार करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी लांब जाताना दिसत आहे, तर काही आई-वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे पाठवीत आहेत. यामुळे आई-वडिलांच्या संपर्कात आल्यानंतर कालांतराने मुलांनाही संसर्ग होऊन तो आतापर्यंत काळजी घेणाऱ्या म्हाताऱ्या आजी-आजोबांसह नातेवाइकांनाही कोरोनाच्या सावटात ओढत आहे. परिणामी मुलांवर उपचार करण्यासाठी त्यांची धावपळ उडते. त्यामुळे पालकांनी काळजी घेऊन मुलाबाळांनाही आपल्याच सोबत ठेवून योग्य उपचार घेण्याची गरज आहे.
तुमची काळजी इतरांसाठी ठरत आहे संकट
पालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर काळजीपोटी पालक मुलाबाळांना शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे ठेवतात. त्यामुळे मुलांमध्ये आई-वडिलांपासून दूर झाल्याची भावना निर्माण होऊन त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यातूनच मग त्या मुलांनाही कोरोनाची बाधा होऊन ते ज्यांच्याकडे राहायला गेलेत, त्यांनाही कोरोना आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालकांना कोरोनाच्या काळात मुलांप्रती असलेली ही काळजी इतरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
मुले पाच दिवसांनंतर येऊ शकतात पॉझिटिव्ह
घरातील एका व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना पाच दिवसांनंतरही बाधा होण्याची शक्यता असते. आई-वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर मुले पूर्णपणे ठणठणीत आहेत, असे समजून त्यांना बाधा होऊ नये म्हणून इतरत्र पाठविले जाते; पण पाच दिवसांनंतरही या मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना इतरत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग वाढविण्यापेक्षा घरीच ठेवणे फायदेशीर ठरणारे आहे.