गाडेघाटातील आदिवासी जगताहेत उपेक्षिताचे जीणे
By admin | Published: May 26, 2016 12:03 AM2016-05-26T00:03:03+5:302016-05-26T00:03:03+5:30
राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही.
समस्यांची गर्दी : शासकीय योजनांचा पत्ता नाही
किन्ही (जवादे) : राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही. या बाबी तर दूर मुलभूत सुविधाही त्यांना उपलब्ध होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवार गाठावे लागते. एवढेच काय तर सदर गाव ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येते तेथील सचिवाचेही कधी या गावाला दर्शन झाले नाही. समस्यांच्या गर्दीत हे गाव सापडले आहे.
पिंपरी (सावित्री) या ग्रामपंचायत अंतर्गत गाडेघाट या गावाचा समावेश आहे. ग्रामपंचायतीकडून कुठल्याही योजनांचा लाभ या भागाला दिला जात नाही. वैयक्तिक सुविधाही पुरविल्या जात नाही. आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या या गावामध्ये गावकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी साधा हातपंपही नाही. गावशिवारात असलेल्या शेतातून पाणी आणावे लागते.
सांडपाण्याच्या नाल्या नेमक्या आहे. त्याही कधी स्वच्छ केल्या जात नाही. कचऱ्याने भरलेल्या नालीमुळे दुर्गंधी वाढली आहे. ग्रामपंचायतीचा कर्मचारी कधीही या भागात फिरकत नाही. वीज खांबावर पथदिवे नाही. अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. पावसाळ्यात तर प्रचंड हाल सोसावे लागते. सर्वत्र पाणी साचून राहते. कालांतराने त्याचे रूपांतर गटारामध्ये होते. त्यात तयार होणारे डास आरोग्यासाठी घातक ठरते.
पिंपरी(सावित्री) ग्रामपंचायतीला असलेल्या ग्रामसचिवाचे गाडेघाटकडे दुर्लक्षच नाही, तर त्यांचे कधी या गावाला दर्शनच झाले नाही. काम पडल्यास आदिवासी बांधवांना त्यांचा शोध घ्यावा लागतो. शासनाच्या विविध योजना पिंपरी(सावित्री)मध्येच जिरतात. पदाधिकारी आणि सचिवांना या गावाशी काहीएक देणे-घेणे नसल्याचे दिसून येते, असा आरोप या गावातील रामेश्वर सिडाम यांनी केला आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर आदी योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचत नाही. पात्र असूनही लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केल्यास समाधानकारक उत्तर दिले जात नाही. परिणामी या गावातील नागरिकांना उपेक्षित जीणे जगावे लागत आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
राळेगाव तालुक्यातील गाडेघाट म्हणजे समस्यांचे माहेरघर अशी अवस्था झाली आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही कधीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आमचा उपयोग केवळ मतदानापुरताच काय, असा सवाल आहे.