कर्ज देता का कुणी कर्ज?

By admin | Published: November 26, 2015 02:56 AM2015-11-26T02:56:21+5:302015-11-26T02:56:21+5:30

नोकरीसाठी वणवण भटकूनही पदरी निराशा आलेले शेकडो तरुण आता व्यवसाय उभारणीसाठी धडपडत आहे.

Loan Against Loan? | कर्ज देता का कुणी कर्ज?

कर्ज देता का कुणी कर्ज?

Next

बेरोजगारांचा टाहो : बँकांकडून केली जातेय थट्टा
खुशाल खंदारे  धनोडा
नोकरीसाठी वणवण भटकूनही पदरी निराशा आलेले शेकडो तरुण आता व्यवसाय उभारणीसाठी धडपडत आहे. कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. मात्र बँकांकडून या तरुणांची थट्टा चालविली जात असून कर्ज देता का कुणी कर्ज असा टाहो शेकडो बेरोजगार महागाव तालुक्यात फोडताना दिसत आहे.
महागाव तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नाही. गुंज येथे असलेला एकमेव साखर कारखानाही बंद पडला आहे. त्यामुळे तालुक्याच्या बेरोजगारीत भर पडली. सहकारी तत्वावरील कापूस प्रक्रिया उद्योगही बंद झाले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांची फौज महागाव तालुक्यात निर्माण झाली आहे. अनेक जण पोटाची खडगी भरण्यासाठी महानगराकडे धाव घेत आहे. तर काही तरुण गावातच उद्योग व्यवसाय उभारण्याच्या तयारीत आहे. उद्योग व्यवसाय म्हटला की भांडवलाचा प्रश्न आला आणि भांडवलासाठी हवा असतो पैसा आणि हाच पैसा अनेकांजवळ नाही.
शासनाच्या विविध योजनांतून लघु उद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज दिले जाते. प्रसिद्धी माध्यमातून त्याची माहिती दिली जाते. विविध महामंडळाच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. एखादा तरुण उद्योग उभारण्यासाठी बँकेत कर्जासाठी जातो. तेव्हा त्याला वेगळाच अनुभव येतो. बँकेच्या जाचक अटी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीने बेरोजगाराला कर्ज नको, अशी म्हणण्याची वेळ येते. अनेक तरुणांनी तर शेवटच्या टप्प्यात कर्ज नको असे म्हणत उद्योग व्यवसाय करण्याचे स्वप्न गुंडाळून ठेवले आहे.
कागदपत्रे मंजुरी आदी घेताना काय आटापीटा करावा लागतो हे त्या बेरोजगारालाच माहीत असते. एक दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी त्याला मानसिक यातना सहन कराव्या लागते. शेवटी बँक कर्ज मंजूरही करते. ते केवळ २० ते ३५ हजार रुपयांचे. एवढा मोठा आटापिटा केल्यानंतर मिळालेल्या कर्जात उद्योगही उभारता येत नाही. हाती आलेले पैसे तसेच खर्च होतात आणि कर्जाचा डोंगर बेरोजगार तरुणाच्या डोक्यावर वाढत राहतो. एकीकडे नोकऱ्या नाही आणि दुसरीकडे उद्योगासाठी कर्ज मिळत नाही, अशी अवस्था आहे.

Web Title: Loan Against Loan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.