कर्ज वाटप, महसुलात जिल्हा राज्यात ‘टॉप’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:52 PM2018-09-10T21:52:21+5:302018-09-10T21:52:38+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात त्यांनी विविध आघाड्यांवर यश मिळवित जिल्ह्याला राज्यात टॉपवर नेऊन ठेवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात त्यांनी विविध आघाड्यांवर यश मिळवित जिल्ह्याला राज्यात टॉपवर नेऊन ठेवले आहे.
डॉ. देशमुख यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचे आव्हान स्वीकारून सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांवर प्रशासनाचा फोकस ठेवला. पीक कर्ज वाटपात त्यांनी प्रशासनाचा दणका राष्ट्रीयकृत बँकांना दाखवून दिला. शासनाचे खाते या बँकांमधून काढून सुमारे ५०० कोटींच्या ठेवी वळत्या केल्या. त्यामुळे काहीशा जाग्या झालेल्या या बँकांनी मग पीक कर्ज वाटपात हात सैल केला. त्यामुळे जिल्हा पीक कर्ज वाटपात राज्यात टॉप फाईव्हमध्ये पोहोचला.
महसूल, झिरो पेन्डन्सी, ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’, रेशीम शेती, मत्स्य जिरे निर्मिती, आॅक्सीजन पार्क, वैद्यकीय कक्ष, वॉटर कप, भूसंपादन योजना अशा विविध उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करीत यवतमाळचे नाव राज्याच्या सरकार व प्रशासनात उंचाविले. झिरो पेन्डन्सीवर भर देताना जिल्हाधिकारी कार्यालयातून तीन ट्रक रद्दी काढण्यात आली. आता तालुकास्तरावर त्यासाठी भर दिला जात आहे. फेरफार नोंदी आॅनलाईन करण्यातही राज्यातील २० तालुके ‘टॉप’ आहेत. त्यात १३ तालुके एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील आहे हे विशेष.