पीक विम्यातून कर्ज वसुली

By admin | Published: June 5, 2016 02:05 AM2016-06-05T02:05:59+5:302016-06-05T02:05:59+5:30

बुडित कर्जाचा डोंगर वाढत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची वसुली पीक विम्याच्या रकमेतून करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loan Recovery From Crop Insurance | पीक विम्यातून कर्ज वसुली

पीक विम्यातून कर्ज वसुली

Next

जिल्हा मध्यवर्ती बँक : जबाबदारी निरीक्षक व शाखा व्यवस्थापकावर
यवतमाळ : बुडित कर्जाचा डोंगर वाढत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची वसुली पीक विम्याच्या रकमेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. या वसुलीसंबंधीचे आदेश ३० मे रोजी जारी करण्यात आले असून वसुलीची ही जबाबदारी प्रत्येक शाखेच्या निरीक्षक व शाखा व्यवस्थापकावर सोपविण्यात आली.
जिल्हा बँकेच्या वसुली विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ३० मे २०१६ रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. सन २०१५-१६ च्या राष्ट्रीय कृषी पीक विमा नुकसानभरपाई रकमेतून थकीत कर्जाची कपात करण्याबाबतचा हा आदेश आहे. थकीत कर्जदार सभासदाची पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम कर्जात जमा न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी निरीक्षक व शाखा व्यवस्थापक यांच्यावर निश्चित केली जाईल, असेही या आदेशात नमूद केले आहे.
पीक विम्यातून थकीत कर्ज वसुलीच्या या आदेशाचे जिल्हा बँकेच्या वसुली विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याने समर्थनही केले आहे. पीक कर्जामुळे जिल्हा बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळेच शेती कर्जाचा एनपीए सरसकट गृहित धरु नये, त्यातून सवलत देण्यात यावी, अशी विनंती शासनाला केल्याचेही सांगण्यात आले. सध्या तरी पीक विम्यातून कर्ज वसुलीचा आदेश कायम आहे. मात्र जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांच्या कालच्या आदेशानंतर नव्याने नोटशिट टाकण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. विम्यातून कर्ज वसुलीच्या आदेशाची कल्पना देताच शेतकरी जाम भडकत आहेत.
पीक कर्जाचे ४८७ कोटी थकीत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गतवर्षी वितरित केलेल्या पीक कर्जाचे आतापर्यंत ४८७ कोटी रुपये थकीत आहे. १ लाख १७ हजार सभासदांकडे ही थकबाकी आहे. सन २००९ ला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यानंतरच्या वर्षापासून ही थकीत बाकी आहे.
गाडे पाटलांचे साकडे
जिल्हा बँकेने संचालक बाबासाहेब गाडे पाटील यांनी सरसकट सर्वच सभासदांना पीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे साकडे घातले आहे. जिल्ह्यातील २ हजार ५३ गावे दुष्काळात असल्याने अपात्र ठरलेल्या १ लाख १८ हजार शेतकऱ्यांनाही पीक विमा रकमेचा लाभ द्यावा, अशी विनंती गाडे पाटील यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

बँकेच्या यंत्रणेला करावा लागतो रोषाचा सामना
जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून विमा रकमेतून कर्ज वसुलीचे आदेश धडकले आहे. त्यानुसार बँक शाखांमधून शेतकऱ्यांना कल्पना दिली जात आहे. मात्र वसुलीची बाब ऐकताच शेतकरी बँकेच्या यंत्रणेवर जाम भडकत आहे. त्यांच्या रोषाचा यंत्रणेला सामना करावा लागतो आहे. आधीच दुष्काळ आहे, मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी कर्ज वसुली करू नका, असे आदेश देत असताना तुम्ही विमा रकमेतून कर्ज कसे काय कापता, असा जाब शेतकरी बँकेला विचारत आहे.

जिल्हा बँकेला विम्याचे १०१ कोटी प्राप्त
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३ लाख ७ हजार ८८१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. २०२ लाख ४१ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रातील पिकासाठीचा हा विमा होता. त्यापोटी १०१ कोटी ३० लाख ९४ हजार रुपये पीक विमा नुकसानभरपाई म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाले आहे. ही रक्कम १ लाख ६० हजार ४८३ हेक्टर क्षेत्रासाठी आहे. १ लाख ८९ हजार ६४० सभासद शेतकऱ्यांना ती वितरित केली जाणार आहे.

Web Title: Loan Recovery From Crop Insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.