अवनीच्या बछड्यांचे लोकेशन पांढरकवड्यातच, ‘एपीसीसीएफ’ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:16 PM2018-11-15T19:16:15+5:302018-11-15T19:16:31+5:30

नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली आहे.

The location of Avni Tiger calf in Pandharkavada | अवनीच्या बछड्यांचे लोकेशन पांढरकवड्यातच, ‘एपीसीसीएफ’ची माहिती

अवनीच्या बछड्यांचे लोकेशन पांढरकवड्यातच, ‘एपीसीसीएफ’ची माहिती

Next

पांढरकवडा (यवतमाळ) - नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली असून गुरुवारी १५ नोव्हेंबर रोजीच सकाळी या दोनही बछड्यांचे वनखात्याला दर्शन झाल्याचे स्पष्ट केले आहे.

१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणा-या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करण्यात आले. तेव्हापासून तिचे बछडे दिसेनासे झाले होते. त्यांचे वय अवघे दहा ते अकरा महिने असल्याने त्यांना मोठी शिकार करता येत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार सुरू असावी, असा अंदाज वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहे. काहींनी तर या बछड्यांनाही वनखात्याने संपविले नाही ना, अशी शंका व्यक्त केली. त्यासाठी ४ नोव्हेंबरनंतर वरूड डॅमनंतर या बछड्यांचे दर्शन झाले नसल्याचा हवाला वन्यजीवप्रेमींकडून दिला गेला. परंतु अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये (वन्यजीव नागपूर) यांनी अवनीचे दोनही बछडे सुरक्षित असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. 

सुरक्षित पकडण्याची व्यूहरचना
लिमये म्हणाले, वाघाचे हे दोनही बछडे पांढरकवडा तालुक्यातच आहे. गुरुवारी सकाळी ५ ते ६ वाजतादरम्यान तालुक्यातील विहीरगाव येथे या दोन्ही बछड्यांचे लोकेशन मिळाले. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी वन खात्याची यंत्रणा तैनात आहे. मात्र मोठ्या संख्येने मनुष्यबळ लावता येत नाही. त्यामुळे गोंधळून हे बछडे दूर कोठे निघून जाण्याचा धोका असतो. त्यांना जंगलातच अन्न मिळावे म्हणून ४५ ठिकाणी पिंजरे लावून त्यात बकरी, डुकराचे पिल्ले व मांस ठेवण्यात आले आहे. बछडे मांस खाण्यासाठी पिंज-यात येताच त्यांना सुरक्षितरित्या पकडण्याची वन खात्याची व्यूहरचना आहे. या पिंज-यांमध्ये जनावरांची पिल्ले बांधून ठेवण्यात आली आहे. ते अन्नासाठी नेमक्या कोणत्या ठिकाणी वारंवार येतात, हे तपासले जात आहे. त्यावर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्यानंतर योग्यवेळी या बछड्यांना बेशुद्ध केले जाणार असल्याचे सुनील लिमये यांनी सांगितले. 

दिल्लीचे पथक रवाना
अवनीच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून आलेली चमू गुरुवारी सायंकाळी रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The location of Avni Tiger calf in Pandharkavada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.