लॉकडाऊनमुळे गुढी पाडव्याचा मुहूर्त चुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:38 AM2021-04-12T04:38:09+5:302021-04-12T04:38:09+5:30
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी वाहनांसोबत सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. काही जण नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी ...
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी वाहनांसोबत सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. काही जण नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेवर निर्बंध आहेत. त्यामुळे सराफा व वाहन व्यवसायासह अन्य व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शासनाने बाजारपेठेवर लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफा बंद राहणार आहे. या मुहूर्तावर बूक झालेल्या तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या, या चिंतेत व्यावसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर शेकडो स्थानिक रोजगार व बंगाली कारागीर उदरनिर्वाह करतात. गतवर्षीही गुढी पाडवा, अक्षय तृतीयेचा मुहूर्त चुकल्याने सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते.
वाहन विक्रेत्यांचीही हीच परिस्थिती आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, यंदा कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास गुढी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बूक करणाऱ्या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही, हा प्रश्न व्यावसायिकांना भेडसावत आहे.
बॉक्स
विवाह सोहळ्याच्या आणि गुढी पाडवाच्या मुहूर्ताच्या ऑर्डर पूर्ण करण्याला वेळ मिळणे अपेक्षित होते. परंतु व्यावसायिकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे बँकेचे व्यवहार, मालाची व्यवस्था यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान गुढी पाडव्याच्या घेतलेल्या ऑर्डर ग्राहकांना पूर्ण करून डिलिव्हरी देण्यासाठी वेळ मिळणे आवश्यक असल्याचे व्यावसायिक विक्रम वर्मा, अनूप मामिडवार, अनूप मामिडवार आदींनी सांगितले.