‘वसंत’ कारखान्याला कुलूप ठोकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:21 PM2018-12-07T23:21:46+5:302018-12-07T23:23:06+5:30
तालुक्याच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला अकोल्याच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कुलूप ठोकले. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील एक कोटी ८४ लाख २९ हजार ३८६ रुपये थकीत असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्याच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला अकोल्याच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कुलूप ठोकले. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील एक कोटी ८४ लाख २९ हजार ३८६ रुपये थकीत असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली.
कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी पीएफ मिळविण्यासाठी अनेकदा कारखाना व्यवस्थापनाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांचा हक्काचा पैसा कारखाना देत नसल्याने या अनुषंगाने अकोल्याच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी कारखान्याला नोटीसद्वारे वेळोवेळी सूचित केले. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. अखेर शुक्रवारी आयुक्तालयाच्या पथकाने प्रत्यक्ष कारखान्याला कुलूप ठोकून सांकेतिक ताबा घेतला.