शिक्षकासाठी खैरी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:48 PM2018-12-01T23:48:13+5:302018-12-01T23:48:49+5:30
नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थ्यांनीच खैरी येथील लोक विद्यालयाला कुलूप ठोकले. वडकीच्या ठाणेदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थ्यांनीच खैरी येथील लोक विद्यालयाला कुलूप ठोकले. वडकीच्या ठाणेदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
खैरी येथील लोक विद्यालयातील गणिताचे शिक्षक सचिन ढोके यांना अतिरिक्त ठरवून श्ुक्रवारी तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले. मात्र ही बदली सूड भावनेतून केल्याचा पालकांचा आरोप आहे. शाळेत गणिताचे दुसरे शिक्षकच नसल्याने पाल्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शनिवारी सकाळी पालकांसह विद्यार्थ्यांनी शिक्षकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन सुरू केले.
चिमुकल्यांच्या आंदोलनाची दखल घेत वडकीचे ठाणेदार प्रशांत गिते यांनी खैरीला लगेच भेट दिली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. शिक्षणाधिकारी चवणे यांनी सदर शिक्षकास त्वरित रुजू करून त्याच जागी समायोजन करुन घ्यावे, असे आदेश फोनवरूनच मुख्याध्यापक जवादे यांना दिले.
त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी आंदोलन मागे घेतले. शिक्षकाची बदली रद्द केल्यामुणे मुलांनी आनंदोत्सव साजरा केला.