कारेगाव येथील शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
By admin | Published: July 5, 2015 02:24 AM2015-07-05T02:24:24+5:302015-07-05T02:24:24+5:30
शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ निश्चित असते. मात्र कारेगाव (रामपूर) येथील शाळेला हा नियम लागू नसल्याचीच परिस्थिती होती.
मनमानी कारभार : मुख्याध्यापकाची बदली
रुंझा : शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ निश्चित असते. मात्र कारेगाव (रामपूर) येथील शाळेला हा नियम लागू नसल्याचीच परिस्थिती होती. या प्रकारातूनच पालकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. अखेर मुख्याध्यापकाची बदली करण्यात आली. शिवाय उर्वरित शिक्षकांना समज देण्यात आली.
पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत कारेगाव (रामपूर) येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत एक ते सातपर्यंत वर्ग आहे. पटावर ६५ विद्यार्थी आहे. सर्व वर्गांसाठी सात शिक्षक मंजूर आहे. यातील एक शिक्षक गेली एक वर्षांपासून गैरहजर आहे. कार्यरत सहा शिक्षकांचीही मनमानी मागील काही वर्षांपासून सुरू होती. शाळेची वेळ सकाळी ११ ते ५ असली तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना वाटेल तेव्हा शाळा उघडणे आणि बंद करण्याचा नित्यक्रम सुरू होता. शुक्रवारी ४ वाजताच वर्ग सोडून देण्यात आले.
पाल्य शाळा सुटण्याच्या वेळेच्या आतच घरी पोहोचल्याने त्यांना पालकांकडून विचारणा सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कानावरही ही बाब टाकण्यात आली. सर्व पालकवर्ग शाळेवर धडकला. त्यांनी कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. या बाबीची माहिती पंचायत समितीला कळविण्यात आली.
शनिवारी पंचायत समितीचे अधिकारी कारेगावात धडकले. गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी दाखल झाले. त्यांनी उपस्थित शिक्षकांना होत असलेल्या प्रकाराविषयी जाब विचारला.
यानंतर गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तत्काळ मुख्याध्यापकाच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. यानंतर दुपारी ४ वाजता शाळेचे कुलूप उघडण्यात आले. (वार्ताहर)