Lok Sabha Election 2019; वणी विधानसभा क्षेत्रात ३२५ मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 09:56 PM2019-04-09T21:56:24+5:302019-04-09T21:58:02+5:30
११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
११ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन दाखल करण्याला सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी विधानसभा क्षेत्रात सुरू झाली. मंगळवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जवळपास ३२५ मतदान केंद्र आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये विद्युत व्यवस्था नसल्याने निवडणूक विभागातर्फे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सात अतिसंवेदनशील केंद्रामध्ये वणी तालुक्यातील तरोडा व भालर या केंद्राचा समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी एक हजार ५२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद शिक्षक, प्राध्यापक, वेकोलि कर्मचारी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकुण दोन लाख ८२ हजार ५६४ मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील ३२ मतदान केंद्र संवेदनशिल असून या केंद्रावर चित्रीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या संवेदनशिल केंद्रामध्ये राजूर, चिखलगाव, घोन्सा, भालर, उकणी, तरोडा, कुरई, झरी तालुक्यातील कुंभा, नवरगाव, वेगाव या केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर अधिक प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी यासाठी ३० राखीव पोलिसांचे पथक गठीत केले आहे. तसेच वणी व शिरपूर पोलीस ठाण्यातील ५६ पोलीस कर्मचाºयांची ११३ मतदान केंद्रांवर नजर असणार आहे.
केळापूर-आर्णी क्षेत्रात ३७३ मतदान केंद्र
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रातील ३७३ केंद्रावर मतदान होणार आहे. विधानसभा क्षेत्रातील २९३ गावांत एकूण तीन लाख पाच हजार ७६४ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ५८ हजार ४४ पुरूष मतदार, तर एक लाख ४७ हजार ७१७ महिला मतदार आहेत. तालुक्यातील ८० गावे या मतदार संघाला जोडली असून घाटंजी तालुक्यातील १०८ गावे व आर्णी तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे. घाटंजी तालुक्यातील १३३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून आर्णी तालुक्यात १४० व केळापूर तालुक्यात १०० मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे.