Lok Sabha Election 2019; आंबेडकरांच्या सभेने काँग्रेसमध्ये हूरहूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 09:55 PM2019-04-05T21:55:51+5:302019-04-05T22:04:10+5:30

शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची नजर एकमेकांच्या मतविभाजनावर खिळली आहे. परंतु या विभाजनाचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत.

Lok Sabha Election 2019; Ambedkar's meeting create tension in Congress | Lok Sabha Election 2019; आंबेडकरांच्या सभेने काँग्रेसमध्ये हूरहूर

Lok Sabha Election 2019; आंबेडकरांच्या सभेने काँग्रेसमध्ये हूरहूर

Next
ठळक मुद्देप्रहारच्या शेतकरी महिला उमेदवारानेही वाढविली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची नजर एकमेकांच्या मतविभाजनावर खिळली आहे. परंतु या विभाजनाचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत. बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या दिग्रसमध्ये झालेल्या सभेने काँग्रेसच्या चिंतेत भर टाकली आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेत थेट लढत होत आहे. परंतु या दोन्ही पक्षांना मतविभाजन करणाऱ्या उमेदवारांचा अधिक धोका आहे. भाजपचे बंडखोर शिवसेनेला मायनस करतील असे मानले जात असले तरी त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. कारण या बंडखोराचे सामाजिक समीकरण शिवसेना पक्ष व त्यांच्या उमेदवाराच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीवर नाराज आहेत. त्यातच सेनेतील समाज बांधव नेत्याचेही पटत नसल्याने या नाराजीत आणखी भर पडली. नाराजीतील ही सर्व मते काँग्रेसकडे वळणार होती. परंतु भाजप बंडखोराच्या निमित्ताने काँग्रेसकडे वळणारी ही मते थांबली. या मतांनी आता बंडखोराकडे आपला कल वळविला आहे. त्यामुळे या बंडखोरीचे सर्वाधिक नुकसान काँग्रेसला होईल.
बसपा, वंचित बहुजन आघाडी, प्रहारचे उमेदवारही मतविभाजनाच्या दृष्टीने बरेच सक्षम ठरत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिग्रसमध्ये सभा घेतली. या सभेतून त्यांनी समाज बांधवांना योग्य संदेशही दिला. सभेला चांगली गर्दीही जमली. वंचितचा उमेदवार थेट काँग्रेसलाच मायनस करणारा आहे. त्यातच आंबेडकरांच्या सभेमुळे मतांच्या मायनसची व्याप्ती वाढणार आहे. त्याचा मोठा फटका काँग्रेसलाच बसू शकतो. बसपाचा उमेदवार रिंगणात आहे. २०१४ च्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराने तब्बल ४८ हजार मते घेतली होती. यातील बहुतांश मते काँग्रेसच्या वाट्याची मानली जातात. बसपासुद्धा काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडणार आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा महिलेला यवतमाळ-वाशिमचा आपला लोकसभेचा उमेदवार बनविले आहे. अंगणवाडी मदतनीस असलेली ही उमेदवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा मान मिळाल्याने सर्वत्र प्रकाशझोतात आली आहे. आपली लढत थेट काँग्रेसच्या दिग्गज माजी प्रदेशाध्यक्षांशी असल्याचे प्रहारकडून सांगितले जात आहे. प्रहारने प्रचाराची आगळीवेगळी पद्धत अवलंबिली. प्रत्येक गावात प्रचारासोबतच उमेदवाराच्या खर्चासाठी प्रहारचे कार्यकर्ते झोळी फिरवित आहे. बहुतांश ठिकाणी बैलबंडीतून प्रचार केला जात आहे. ही वेगळी पद्धत मतदारांना आकर्षित करीत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गरीब कुटुंबातील शेतकरी विधवेला थेट लोकसभेची उमेदवारी दिली गेल्याने ग्रामीण भागातून या महिलेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रहारचा हा उमेदवार बहुतांश काँग्रेसलाच मायनस करणारा ठरू शकतो. एकूणच काँग्रेसच्या मतांना भगदाड पाडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत शिवसेनेकडे तेवढे विभाजन नाही. युतीच्या नेत्यांची नाराजी हा एकमेव विषय शिवसेनेसाठी चिंतेचा असला तरी ८ एप्रिल रोजी यवतमाळात होणाºया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त सभेनंतर नेत्यांच्या नाराजीचा विषय संपलेला असेल व हे नेते एकदिलाने कामाला लागलेले असतील असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवाराकडून व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसकडे नियोजनाचा अभाव, पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी घरातच
लोकसभा निवडणूक लढत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराकडे नियोजनाचा मोठा अभाव दिसतो. एक तर काँग्रेसने दलित, मुस्लीम, ओबीसी, कुणबी समाजाला गृहित धरल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोक पैसे मागतील या भीतीने काँग्रेस उमेदवाराचे कर्तेधर्ते तोंड लपवित असल्याचे सांगितले जाते. फोन न उचलणे, दिशाभूल करणे, टाळाटाळ करणे, तासन्तास प्रतीक्षेत ठेवणे असे प्रकार सुरू आहे. मतदारांना प्रभावित करू शकतील, त्यांचे मत पलटवू शकतील असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी अद्यापही घरात आहेत. काँग्रेसच्या प्रचाराला तेवढ्या संख्येने कुणी बाहेर पडलेले नाही. कारण त्यांना विचारलेच जात नसल्याचा बहुतेकांचा अनुभव व नाराजीसुद्धा आहे. मोठ्या बैठका, सभा व वातावरण निर्मितीचा अभाव पहायला मिळतो. काँग्रेसमधील उमेदवारीला आव्हान देणारे दोन-तीन गट शांत आहेत. यातील काहींनी विरोधाचा सूर आळवला आहे. या सर्वबाबी काँग्रेससाठी नुकसानकारक ठरत आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Ambedkar's meeting create tension in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.