Lok Sabha Election 2019; विधानसभेची सेमी फायनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:31 PM2019-03-31T22:31:31+5:302019-03-31T22:31:57+5:30

लोकसभेच्या या निवडणुकीआड चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम केली जात आहे. या माध्यमातून विधानसभेचे प्रबळ दावेदार व नव इच्छुक उमेदवार आपले प्रचाराचे काम साध्य करून घेत आहे.

Lok Sabha Election 2019; Assembly Semi Final | Lok Sabha Election 2019; विधानसभेची सेमी फायनल

Lok Sabha Election 2019; विधानसभेची सेमी फायनल

Next
ठळक मुद्देनिवडणूक लोकसभेची : दावेदार व इच्छुकांना आयतीच संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या या निवडणुकीआड चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम केली जात आहे. या माध्यमातून विधानसभेचे प्रबळ दावेदार व नव इच्छुक उमेदवार आपले प्रचाराचे काम साध्य करून घेत आहे. विशेष असे त्यासाठी पैसाही लोकसभेच्या उमेदवाराचा वापरला जात आहे.
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, कारंजा व वाशिम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभा लढू इच्छिणाऱ्यांसाठी लोकसभा निवडणूक ही आयतीच संधी चालून आली आहे. सध्या प्रचार लोकसभेचा सुरू असला तरी त्याआडून विधानसभेची बांधणी होताना दिसत आहे. सहा पैकी पाच आमदार युतीचे, सोबतीला भाजपाचे एमएलसी असल्याने लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला ही लढाई सहज सोपी जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात तसे चित्र नाही. अनेक आमदारांबाबत पक्षाचे कार्यकर्तेच निगेटीव्ह सूर आळवत आहेत. त्यामुळे या आमदारांभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. ते पक्षाचे काम करीत आहेत की नाही याबाबत साशंकता आहे. ते अन्य कुणाला मदत करीत आहेत का, की न्युट्रल आहेत, याबाबत अंदाज बांधले जात आहे.
काँग्रेसची मदार माजी आमदारांवर
काँग्रेस आघाडीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराची मदार पक्षाच्या माजी आमदारांवर व अन्य नेत्यांवर आहे. राळेगाव मतदारसंघातील काँग्रेस गटातटात विखुरली आहे. काँग्रेसकडून तेथे विधानसभेसाठी अनेक नवे चेहरे पुढे आले आहेत. जुन्या चेहºयाचीही फिल्डींग कायम आहे. या जुन्या चेहºयाला प्रदेशाध्यक्षांनी सल्ला दिला, विरोधात जाण्याची भूमिका घेऊ नका, त्याऐवजी लोकसभेच्या उमेदवाराला मतांची आघाडी मिळवून द्या, त्यामुळे तुमच्या मतदारसंघातील काँग्रेस पक्षातून उदयास आलेले नवीन चेहरे विधानसभेसाठी आपसुकच बॅकफूटवर जातील. प्रदेशाध्यक्षांचा हा सल्ला राळेगावमधील काँग्रेसच्या जुन्या उमेदवाराला पटलेला दिसतोय. त्यामुळे ते पक्षाच्या कामाला लागले आहे. मात्र काँग्रेस उमेदवारांच्या वाहनांच्या रांगेत त्यांचे वाहन थेट सातव्या-आठव्या क्रमांकावर का याचे कोडे अद्याप कार्यकर्त्यांना उलगडलेले नाही. या तालुक्यात दुसरा गट नुकताच काँग्रेसमध्ये जॉईन झाला. मात्र या गटाचे कार्यकर्ते एकमेकांपासून अंतर राखून आहेत. त्यांच्यातील वर्चस्वाचा फटका लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारत येत नाही.
लोकसभेच्या आड विधानसभेच्या तयारीचे असेच चित्र यवतमाळ मतदारसंघात पहायला मिळते. काँग्रेसचे दोन-तीन स्पर्धक प्रचाराला भिडले आहे. मात्र त्यांच्यात आपसातच स्पर्धा पहायला मिळते. पैसा लोकसभेच्या उमेदवाराचा आणि प्रचार विधानसभेचा असे चित्र सध्या आहे. भाजपा-सेनेतील अंतर्गत गटबाजीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच लोकसभेआड होणारे विधानसभेचे हे सेमी फायनल नेमके कोण जिंकते याचा फैसला २३ मे नंतरच होणार आहे.

भाजपाचे पाच, शिवसेनेचे एक आमदार
विधानसभेच्या सहा पैकी चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. एक शिवसेना तर एक राष्टÑवादीचे आमदार आहे. शिवाय पुसदमधील नव्या दमाचे भाजपाचे विधान परिषद सदस्यही त्यांच्या दिमतीला आहेत.
युतीचे आमदार एखादवेळी लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवारावर नाराज असण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाला बांधील असल्याने युतीच्या उमेदवाराला आपल्या मतदारसंघातून मतांची आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसे न झाल्यास पक्षश्रेष्ठींकडून आगामी विधानसभा निवडणुकीत याच आमदाराला पुन्हा उमेदवारीसाठी रिपीट करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्टÑवादीकडून आघाडीचा धर्म पाळण्याची अपेक्षा
पुसदमध्ये राष्टÑवादीचे ज्येष्ठ व वजनदार आमदार आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस उमेदवाराला मोठ्या अपेक्षा आहेत. ते समाजापेक्षा आघाडीचा धर्म पाळतील, असा विश्वास काँग्रेसच्या गोटात व्यक्त केला जात आहे.
वाशिम जिल्ह्यात आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांवर काँग्रेसची मदार आहे. या नेत्यांना संसद, मंत्री मंडळाचा अनुभव आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Assembly Semi Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.