Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिममध्ये अपक्षांच्या गतीवर काँग्रेस, शिवसेनेच्या विजयाचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:55 AM2019-04-10T11:55:05+5:302019-04-10T11:56:03+5:30
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात अपक्षांची मते घेण्याची गती किती राहते यावर काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून आहे.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात अपक्षांची मते घेण्याची गती किती राहते यावर काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून आहे. या अपक्षांमुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांंना मतविभाजनाचा मोठा फटका बसणार असल्याने तज्ज्ञांनाही अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
११ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. २४ उमेदवार येथे रिंगणात आहेत. काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट लढत असली तरी त्यांच्यापुढे भाजप बंडखोर, प्रहारची शेतकरी विधवा, वंचित बहुजन आघाडी, बसपा या उमेदवारांचे आव्हान आहे. हे उमेदवार जेवढे चालतील तेवढे प्रमुख पक्षांचे उमेदवार ‘मायनस’ होतील, असे समीकरण आहे. परंतू त्यातही कोण कुणाला मायनस करतो हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
राष्ट्रवादी, भाजपने राखले अंतर
खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यापुढे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे आव्हान आहे. दोन्ही उमेदवारांनी आपआपल्या परीने मतदारसंघात दूरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आघाडीत राष्ट्रवादी तर युतीत भाजपने प्रचारात सहभागी होताना अनुक्रमे काँग्रेस व शिवसेनेपासून थोडे अंतर ठेवल्याचे जाणवले. काँग्रेससाठी कोणत्याही मोठ्या नेत्याची एकही सभा झाली नाही. तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली.
प्रचारात विकासाचे मुद्दे दूरच
या निवडणुकीत विकासाचे मुद्दे दूरच राहिले. शिवसेनेने गेल्या पाच वर्षातील मोदींची उपलब्धी सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसनेसुद्धा प्रचारात मोदींच्या विरोधात सूर आवळून नकारार्थी बाजू जनतेसमोर मांडली. या निवडणुकीत प्रहार, भाजप बंडखोर, वंचित आघाडी, बसपा आदी उमेदवार प्रमुख पक्षांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. त्यातही प्रहारला सामान्य जनतेचा तर भाजप बंडखोराला सामाजिक समीकरणातून प्रतिसाद मिळतो आहे. हा प्रतिसाद नेमका किती असेल व तो कुणाला नुकसानकारक ठरू शकतो याचा अंदाज प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून बांधला जात आहे.
सट्टा बाजार सतत खालीवर
कोण अपक्ष किती मते घेईल याबाबत कुणालाही ठोस सांगणे कठीण आहे. त्यामुळेच की काय, सट्टा बाजारात प्रमुख उमेदवारांचे भाव सातत्याने कमी-जास्त होत आहे. मात्र शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराचे सद्याचे दर ५० पैशांनी अधिक आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानानंतर मतांची टक्केवारी पाहून या दरांमध्ये पुन्हा खाली वर होण्याची शक्यता सट्टा बाजारात वर्तविली जात आहे.
निवडणूक ठरली नेत्यांपुरती; कार्यकर्ते दूरच
प्रचार संपायला आला तरी जनतेत मात्र लोकसभा निवडणुकीबाबत फारसा उत्साह पहायला मिळाला नाही. युती आणि आघाडीत ही निवडणूक केवळ नेत्यांपुरती मर्यादित राहिली. कार्यकर्ते निवडणुकीपासून अजूनही दूर आहेत. कंत्राटींच्या बळावर गर्दी जमविली जात आहे. काँग्रेस व शिवसेनेत प्रामुख्याने हे चित्र पहायला मिळाले. या दोन्ही उमेदवारांकडे जीवाभावाच्या, हक्काच्या व विश्वासू ‘हॅन्ड’चा अभाव दिसून आला. त्यामुळे समोर येईल त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय या उमेदवारांना पर्याय नव्हता. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या अपक्षांनी पैशाच्या जोरावर गर्दी जमविण्यात यश मिळविले. गोरगरीब उमेदवारांना मात्र ते शक्य झाले नाही. प्रहारच्या शेतकरी विधवा उमेदवारासाठी राज्याच्या विविध भागातून प्रचारासाठी कार्यकर्ते यवतमाळात तळ ठोकून आहेत. गावागावात लोकवर्गणी गोळा करून त्यातून या उमेदवाराचा प्रचार करण्यात आला.
गुप्तचर यंत्रणेलाही ठोस अंदाज वर्तविणे कठीण
अपक्षांचे मात्र सट्टा बाजारात सध्या तरी कोणतेही दर नाहीत. या अपक्षांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रमुख उमेदवारांचे मतविभाजन अटळ आहे. त्यामुळे गुप्तचर विभागालाही अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
पडद्यामागे कुणाचा ‘सपोर्ट’ किती ?
भाजप बंडखोराला विविध पक्षाच्या नेत्यांकडून पडद्यामागून कुणाचा किती ‘सपोर्ट’ मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे. प्रहारचे कार्यकर्ते गर्दी जमवून आपल्या उमेदवारासाठी परिश्रम घेत असले तरी या गर्दीतील स्थानिक मतदार नेमके किती हा प्रश्न आहे. वंचित आघाडी, बसपासुद्धा आपल्या ग्रामीण मतदारांवर जोर देत आहे. काही बड्या लोकांच्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी ‘भेटी-गाठी’ घेतल्या असून त्यांनी सर्वांनाच शब्दही दिला आहे. मात्र हा शब्द नेमका कुणासाठी फायद्याचा ठरतो की बडे नेते ‘न्युट्रल’ राहून शब्द दिलेल्या सर्वांनाच मदत करतात याकडे नजरा लागल्या आहेत.