Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात निम्मे मतदार तरूण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:47 IST2019-04-08T21:42:54+5:302019-04-08T21:47:51+5:30
जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे.

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात निम्मे मतदार तरूण
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे.
जिल्ह्यात एकूण २० लाख ३८ हजार ५१४ मतदार आहेत. यातील निम्मे मतदार ४० वर्षांच्या आत आहेत. त्याची संख्या तब्बल ११ लाख ६३ हजार ४८९ आहे. विशेष म्हणजे वयाची शंभरी पार करणारेही जिल्ह्यात तीन मतदार आहे. तसेच ८० वर्ष पूर्ण करणारे तब्बल ७१ हजार ३० मतदार आहेत.
वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. त्याचा नवमतदारांनी लाभ घेतला. प्रत्येक राजकीय पक्ष तरूण मतदारांच्या मताधिक्याचा विचार करून आडाखे बांधत होते. नवमतदारांवर त्यांची सर्वाधिक भिस्त होती. मात्र जिल्ह्याची स्थिती फिप्टी-फिप्टी असल्याचे दिसते. तरूण मतदारांएवढीच संख्या उर्वरित मतदारांची आहे. यामुळे आता या मतदारांना बाजूला सारून विचार करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे तरुणांपेक्षा याच मतदारांच्या मतदानाची टक्केवारी जादा आहे. तथापि उन्हामुळे वयोवृद्ध मतदार मतदानासाठी बाहेर पडणार किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.
वयोवृद्धांना थेट मतदान केंद्रात एन्ट्री
यावर्षी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. वयोवृद्ध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांना थेट मतदान केंद्रात एन्ट्री दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी व्हील चेअर, मदतीसाठी मदतनीस दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाने प्रथमच ज्येष्ठांचा खऱ्या अर्थाने आदर केला आहे.