Lok Sabha Election 2019; खर्च सादर न करणाऱ्या सात अपक्षांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:16 IST2019-04-03T22:06:40+5:302019-04-04T13:16:51+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रूपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब दररोज सादर करण्याचे बंधन आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदार संघातील सात अपक्षांनी निवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर केला नाही.

Lok Sabha Election 2019; खर्च सादर न करणाऱ्या सात अपक्षांना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रूपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब दररोज सादर करण्याचे बंधन आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदार संघातील सात अपक्षांनी निवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर केला नाही. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून ४८ तासांत हिशेब सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यवतमाळ-वाशिम मतदार संघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना २, ५ आणि ९ एप्रिल रोजी केंद्रीय खर्च निरीक्षकांसमोर (आॅबझर्व्हर) संपूर्ण खर्च अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले. तसेच दररोजच्या खर्चाचा हिशेबही त्यांना सादर करावा लागेल. मंगळवारी निवडणूक विभागाचे खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व २४ उमेदवारांनी खर्च सादर करणे आवश्यक होते. मात्र १७ उमेदवारांनीच खर्चाचा हिशेब सादर केला.
केंद्रीय खर्च निरीक्षकांसमोर सात उमेदवारांनी खर्चाचा हिशेबच सादर केला नाही. हे सातही उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना ४८ तासांत हिशेब सादर करण्यासाठी निवडणूक विभागाने नोटीस बजावली. यानंतरही त्यांनी खर्चाचा हिशेब न सादर केल्यास त्यांच्याविरूद्ध गुन्हे नोंदविले जाईल, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.
निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांची संख्या जादा आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमदेवारापेक्षाही या अपक्षांनीच सर्वाधिक खर्च केल्याची बाब समोर आली.