Lok Sabha Election 2019; शिवसेनेला रस्त्यावरचे वैर धोकादायक काँग्रेसला सामाजिक तणावाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 09:32 PM2019-04-08T21:32:04+5:302019-04-08T21:36:26+5:30
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान हे यवतमाळ विधानसभेत आहेत. येथील तीन लाख ६३ हजार ६३८ मतदारांपैकी ७० टक्के मतदार एकट्या यवतमाळ शहरात आहे. यवतमाळातील पालिकेच्या राजकारणात शिवसेना-भाजप एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या वैराचा फटका शिवसेना उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदारसंख्या वाशिम मतदारसंघात आहे. तेथे तीन लाख ४० हजार ८०२ मतदार आहेत. यातील ६० टक्के मतदार वाशिम शहरात आहे. या ठिकाणी सामाजिक समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथेही सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये अगदी रस्त्यावरचे वैर आहे. मतदान काढताना याचा प्रभाव पडल्यास युतीच्या उमेदवाराला मायनस करू शकतो. कारंजा शहरात विधानसभेतील ४० टक्के मतदार आहेत. सामाजिक दृष्ट्या संवेदनशील शहर असून त्याचा प्रभाव राहणार आहे. एका गटाकडे किंवा समाजाकडे गेल्यास दुसरा गट व समाज उमेदवारापासून दूर होतो. याचा फटका आघाडीतील उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत. दिग्रस शहरात आघाडीच्या उमेदवाराला अल्पसंख्यक घटकातून अपेक्षित मदत मिळण्याची चिन्हे नाहीत. उलट दिग्रस व दारव्हा येथे काही प्रमाणात सहानुभूतीची लाट तयार होत आहे. राळेगाव व कळंब या दोन तालुक्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी विधवेबद्दल वेगळे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे युती व आघाडीच्या उमेदवाराला येथे चांगला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. पुसदमध्ये ‘नाईक पॅटर्न’ किती यशस्वी होतो यावर आघाडीचे भवितव्य आहे. येथे समाज म्हणून मतदान झाल्यास अपक्षाला ताकद मिळण्याची चिन्हे आहेत.
युती, आघाडीपुढे प्रहार, वंचित, भाजप बंडखोराचे आव्हान
शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांना यापूर्वी २००९ व २०१४ मध्ये राळेगाव विधानसभेतून भक्कम आघाडी मिळाली होती. दिग्रस विधानसभेतही युतीचे गणित जुळले होते. या निवडणुकीत परिस्थिती बदलली असून येथे ग्राफ खाली येण्याची भीती आहे.
आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता विभाजनाचा फटका यवतमाळ शहरात कमी होण्याची चिन्हे आहेत. तसेच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील वैराचा फायदा होऊ शकतो.
प्रहार की अपक्ष प्रहार जनशक्तीच्या शेतकरी विधवा आणि समाज आणि धनशक्तीसह युतीतील नेत्यांचा छुपा पाठिंबा यावर अपक्ष उमेदवार आपला क्रमांक वाढविण्यासाठी लढत देऊ शकतो. यांना ग्रामीण मतदारांची साथ लाभण्याची स्थिती आहे. या दोनही उमेदवारांकडून प्रचार मोहीम जोरात राबविली जात आहे. यासाठी विविध माध्यमे वापरण्यात येत आहे.
2009
राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, वाशिम या चार मतदारसंघातून शिवसेनेला भक्कम लिड मिळाली होती.
2014
पुसद वगळता मोदी लाटेत राळेगाव, कारंजा, वाशिम, यवतमाळ येथे सेनेचा लिड वाढला होता.