Lok Sabha Election 2019; काँग्रेसमध्ये गटबाजी नाहीच, तिकीट मागणे हा सर्वांचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:30 IST2019-04-06T21:27:36+5:302019-04-06T21:30:04+5:30
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांमुळे मतदारसंघातील मतदार काँग्रेस संस्कृतीशी एकरूप आहेत. जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे.

Lok Sabha Election 2019; काँग्रेसमध्ये गटबाजी नाहीच, तिकीट मागणे हा सर्वांचा हक्क
यवतमाळ : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांमुळे मतदारसंघातील मतदार काँग्रेस संस्कृतीशी एकरूप आहेत. जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी नसून तिकीट मागणे हा सर्वांचा हक्क आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या सर्वच उमेदवारांमध्ये प्रचाराची चुरस निर्माण झाली आहे. याच धावपळीत ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर विश्लेषण मांडले.
राज्याच्या राजकारणात २५ वर्षे घालवूनही लोकसभेच्या तिकिटासाठी संघर्ष का करावा लागला, या प्रश्नावर माणिकराव ठाकरे म्हणाले, गेल्यावेळी राहुल ठाकरे यांना ऐनवेळी तिकिट नाकारण्यात आले. मला विधानपरिषदेचे तिकिट नाकारतानाच पक्षनेतृत्वाने लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार जुलैपासूनच मी तयारी सुरू केली. उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच आहे. काँग्रेसच्या पद्धतीनुसार चार टप्प्यांवरून नावे पक्षश्रेष्ठींकडे जातात, त्यातूनच एक उमेदवार ठरतो. पण अनेक जणांनी उमेदवारी मागितली यात मला काही वावगे वाटत नाही.
पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षात गटबाजी एवढी तीव्र नाही. अनेकांनी उमेदवारी मागितली म्हणजे ते आपले विरोधक आहे, असा त्याचा अर्थ नाही. तिकीट मागणारे असे सर्वच जण प्रचाराला लागले आहेत.
या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नसताना आपण कशाच्या बळावर लोकसभा जिंकण्याची आशा बाळगता, यावर ठाकरे म्हणाले, ही राष्ट्रीय निवडणूक आहे. यात धोरणात्मक निर्णय घेतले जातात. सलग चार वेळा निवडूण दिलेल्या सेनेच्या खासदारांचा लोकांना मिळालेला अनुभव वाईट आहे. त्यामुळे खाली कुणाची ताकद आहे, किती आमदार आहे, यापेक्षा लोकांची भावना काय आहे, हेच महत्त्वाचे आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात कोणते मोठे काम झाले की ज्या आधारावर तुम्ही मते मागणार आहात, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था शक्य तेवढी वाढविण्याचे आम्ही प्रयत्न केले. बेंबळा प्रकल्प, मध्यम, लघु प्रकल्प, पांदण रस्त्यांची योजना, वीज बिल माफी, पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, त्यांना फुल्ल ड्रेस, आधुनिक ट्रेनिंग प्रणाली, सर्कल इन्स्पेक्टरचे पद रद्द करून डीवायएसपी, अॅडीशनल एसपीच्या पदांची निर्मीती, जिल्ह्यात ३२ केव्हीचे ११ वीज उपकेंद्र, क्षमता वाढ, पारस (अकोला) येथील वीजनिर्मिती प्रकल्पाचे पुनरूज्जीवन आदी कामे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत.
खासदार निधीचे १०० कोटी गेले कुठे?
शिवसेनेच्या भावना गवळी सलग चार वेळा खासदार आहेत. दरवर्षी २५ कोटी प्रमाणे किमान शंभर कोटी त्यांना खासदार फंड मिळाला. मात्र आज आम्ही एवढ्या गावात फिरताना कुठेही खासदार निधीतून झालेल्या कामाचा फलक दिसला नाही. मग खासदार निधीतील हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘वेगळा विदर्भ’ हाही जुमलाच
२०१४ मध्ये भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर मते मागितली. मात्र आजपर्यंत वेगळा विदर्भ झाला नाही. २०१९ च्या निवडणुकीत तर विदर्भाचा मुद्दाही भाजपच्या प्रचारात दिसत नाही. त्यामुळे भाजपचे वेगळ्या विदर्भाचे आश्वासन ‘जुमला’ ठरले.