Video - मतदान केंद्रावर असुविधा; विजय दर्डा यांच्याकडून नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 03:23 PM2019-04-11T15:23:40+5:302019-04-11T15:37:26+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर यंत्रणेला पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याबाबत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर यंत्रणेला पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याबाबत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी (11 एप्रिल) दुपारी विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा हे मतदानासाठी येथील तहसील चौक स्थित काटेबाई शाळा केंद्रावर आले होते. यावेळी मतदानानंतर तेथील मतदान कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा व वास्तव त्यांच्यापुढे मांडले. मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेसाठी तेथे मंडप टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना उघड्यावर व झाडाच्या आडोशाने आश्रय घ्यावा लागला. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा, जेवण याची कोणताही व्यवस्था करण्यात आली नव्हती. उन्हामुळे सकाळपासून तीनवेळा या कर्मचाऱ्यांनी सावलीच्या शोधात आपले टेबल हलविले. मतदान केंद्र परिसरात दर्शनी भागाला झाडे नसल्याने दुपारनंतरच्या उन्हाच्यावेळी हे टेबल कुठे हलवावे याबाबत चिंता असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या केंद्रावर परीक्षांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचीही ड्यूटी लावण्यात आली होती. वास्तविक ज्यांच्याकडे बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी येतात त्यांची ड्यूटी लावली जाणार नाही, असे धोरण ठरविण्यात आले होते. परंतु हे धोरण कागदावरच राहिले. प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर सक्तीने तैनात करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पेपर तपासणी व पर्यायाने परीक्षेच्या निकालाला विलंब होणार आहे.
मतदान केंद्रावरील या स्थितीबाबत विजय दर्डा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना निवडणूक प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळातील तहसील कार्यालयानजीकच्या मतदान केंद्राची ही स्थिती असेल तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची काय अवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी, अशी प्रतिक्रिया विजय दर्डा यांनी व्यक्त केली. मतदानानंतर एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजय दर्डा म्हणाले, संविधानाने आपणाला मतदानाचा अधिकार दिला असून तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे.
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.