Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सरासरी ६२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 07:36 PM2019-04-11T19:36:13+5:302019-04-11T19:38:14+5:30
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी सरासरी ६२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी सरासरी ६२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. त्यात आणखी आठ ते नऊ टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. काही केंद्रांवर ईव्हीएम बिघडण्याच्या व त्यामुळे मतदारांना ताटकळत रहावे लागण्याचे प्रकार घडले. खासदारकीची चौथी टर्म पूर्ण करून पाचव्यांदा रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह २४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.९७ टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. तर मतदानाची अंतिम टक्केवारी ६२ टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकंदर १९ लाख १४ हजार ८०५ मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा खासदार या मतदारसंघातून निवडून जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी २२०६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. विशेष म्हणजे, उन्हाचा तडाखा प्रचंड असतानाही मतदारांनी मताधिकार बजाण्यासाठी उत्साह दाखविला. भर उन्हातही मतदानाची टक्केवारी वाढताना पाहायला मिळाली.
सकाळी पहिल्या दोन तासात केवळ ५.०३ टक्के मतदान झाले. तर नंतरच्या दोन तासात सकाळी ११ वाजेपर्यंत १२.०६ टक्के मतदान नोंदविले गेले. मात्र एकीकडे उन्ह वाढत असताना दुसरीकडे मतदानाचीही टक्के वाढत गेली. दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघात २६.०९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तर दुपारी ३ पर्यंत ही टक्केवारी वाढून ४३.४२ पर्यंत पोहोचली. यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी विविध कामे बाजूला सारुन मतदानासाठी धाव घेतली. राळेगाव तालुक्यातील अरुण केवटे नामक तरुणाने स्वत:चे लग्न असतानाही आधी मतदान नंतर लग्न असा निर्णय घेतला. वयोवृद्ध, अपंगांनीही शारीरिक अडचणींवर मात करीत मतदान केंद्रांपर्यंत धाव घेतली. दिवसभर मतदान केंद्रांवर उत्साह पहायला मिळाला. सायंकाळी ६ वाजताही मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा कायम होत्या. अनेक केंद्रांवर ६ नंतरही मतदानाची मूभा द्यावी लागली. कळंब तालुक्यातील वेणी कोठा येथे सायंकाळी ईव्हीएम बिघडल्याने मतदारांना वेळ संपल्यानंतर तासभर मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. नेर तालुक्यातील आजंतीच्या नागरिकांनी पाणीटंचाईच्या मुद्यावर मतदानावर बहिष्कार घातला. तेथे बहुतांश मतदारांनी पाठ फिरविल्याने केंद्रावर शुकशुकाट होता.
विजय दर्डांनी बजावला हक्क
लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी यवतमाळ येथील काटेबाई शाळा मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजय दर्डा म्हणाले, संविधानाने आपणाला मतदानाचा अधिकार दिला असून तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे.